फिरकीचा जादुगार आर अश्विनचा अचानक निवृत्तीचा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा होता. तसं पाहिलं तर, या खेळाडूमध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. मात्र वृत्तांवर विश्वास ठेवला तर, भारतासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विननं याबाबत बराच काळ विचार केला होता.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रविचंद्रन अश्विननं निवृत्तीची घोषणा अचानक केली असेल, परंतु हे असं पाऊल होतं ज्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. गेल्या वेळी ऑस्ट्रेलियन संघ बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला तेव्हा याबाबत वावड्या उठल्या होत्या. मात्र नंतर त्या सर्व अफवाच असल्याचं निष्पन्न झालं.
अहवालांवर विश्वास ठेवला तर, अश्विननं त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. अश्विनला गेल्या काही काळापासून गुडघ्याचा त्रास सतत जाणवतोय. अश्विननं कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वीच त्याच्या कुटुंबीयांना सांगितलं होतं की तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. ऑस्ट्रेलियात परिस्थिती कशी असेल ते पाहून निर्णय घेणार असल्याचं अश्विननं कुटुंबाला सांगितलं होतं. मंगळवारी रात्री त्यानं कुटुंबीयांना सांगितलं की 18 डिसेंबर हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा दिवस असेल.
कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं की, पर्थला पोहोचल्यानंतर त्यानं अश्विनशी बराच वेळ संवाद साधला होता. अश्विननं संघातील प्रत्येक खेळाडूला या निर्णयाबद्दल स्वतंत्रपणे माहिती दिली होती, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. अश्विनला मेलबर्न आणि सिडनीमध्ये खेळण्याची संधी असली तरी त्यानं मालिका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे.
अश्विन आता तामिळनाडूसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसू शकतो. त्यानं आधीच सांगितलं आहे की, तामिळनाडूला रणजी करंडक जिंकून देणं हे त्याचं स्वप्न आहे. चालू मोसमात तामिळनाडू अजूनही प्ले-ऑफमध्ये आहे. अशा परिस्थितीत आता अश्विन संघात सामील होऊ शकतो.
हेही वाचा –
रहाणे-पुजाराच्या निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माची मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाला…
3 खेळाडू जे भारतीय कसोटी संघात आर अश्विनची जागा घेऊ शकतात
अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केलं, गंभीर-रोहित जोडीवर प्रश्न उपस्थित