बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या घोषणेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. सामना संपल्यानंतर अश्विननं निवृत्ती जाहीर केली तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले.
हा अनुभवी ऑफ स्पिनर पत्रकार परिषदेला आला, परंतु त्यानं निवृत्ती जाहीर करताना कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला. यामुळे अनेकांना पडद्यामागे काहीतरी घडल्याचा संशय येतोय. आता काही अहवालात नमूद केलेली कारणे आणि जे चित्र समोर आलं, त्यानुसार यामागे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची मोठी भूमिका दिसून येत आहे. अश्विननं अशी तडकाफडकी निवृत्ती का घेतली असावी, यामागची कारणं आपण या 6 मुद्द्यांद्वारे समजून घेऊया.
(1) प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची हमी मिळल्याशिवाय अश्विन ऑस्ट्रेलियाला जाण्यास तयार नव्हता. न्यूझीलंडविरुद्ध 0-3 असा व्हाईटवॉश झाल्यानंतरच अश्विननं आपल्या भविष्याचा विचार करायला सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडीबाबत अश्विननं निवडकर्त्यांकडे अंतिम अकरामध्ये खेळण्याची हमीही मागितली. त्याला काही प्रमाणात हमी देण्यात आली होती.
(2) अश्विनला पहिला धक्का तेव्हा बसला, जेव्हा पर्थमध्ये त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं. अर्थात याचा अश्विनला खूप त्रास झाला. इथूनच अश्विननं उर्वरित मालिकेसाठी संघात राहायचं की नाही यावर अधिक विचार सुरू केला.
(3) अश्विन कर्णधार रोहितशी या परिस्थितीबद्दल बोलला, जिथे त्यानं स्पष्टपणे सांगितलं की जर संघाला त्याची गरज नसेल तर तो निवृत्त होईल. मात्र रोहितनं अश्विनला कसंतरी पिंक बॉल कसोटीपर्यंत थांबण्यास सांगितलं. रोहितने दिलेलं वचन पाळले आणि अश्विननं दुसरा कसोटी सामना खेळला. परंतु या सामन्यात भारताचा दहा गडी राखून पराभव झाला, ज्यात अश्विनला एकच बळी घेता आला. कदाचित या कामगिरीमुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं मन पूर्णपणे बदललं.
(4) तिसऱ्या कसोटीत अश्विनच्या जागी रवींद्र जडेजाचा संघात समावेश करण्यात आला. यामुळे अश्विनसमोर कोणते पर्याय आहेत हे पूर्णपणे स्पष्ट झालं. जडेजाची निवड आणि त्याच्या 77 धावांच्या शानदार खेळीमुळे आता प्लेइंग इलेव्हनमधील अश्विनची जागा जवळपास संपुष्टात आली होती.
(5) सिडनी कसोटीत भारत दोन फिरकीपटू खेळवण्याची शक्यता असली, तरी अश्विनला असं वाटले की त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार नाही. तो सध्या जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरनंतर मॅनेजमेंटची तिसरी पसंती बनला आहे.
(6) रोहित पर्थ कसोटीत उपलब्ध नसताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अश्विनच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग 11 मध्ये घेऊन धाडसी निर्णय घेतला. त्यानं तो त्याच्या धोरणानुसार पुढे जाईल असं स्पष्ट केलं. पण रोहितच्या पुनरागमनानं टीमचं चित्र पालटलं. तिसऱ्या कसोटीत त्याच्या जागी जडेजाचा संघात समावेश होताच या अनुभवी ऑफस्पिनरनं क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा –
“अश्विनच्या निर्णयाचं आश्चर्य वाटतं, त्याला योग्य निरोप मिळायला हवा”, महान कर्णधाराचं वक्तव्य
“माझ्या मुलाला जबरदस्तीनं निवृत्त करण्यात आलं”, आर अश्विनच्या वडिलांचा धक्कादायक आरोप!
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीची मोठी घोषणा, पुढील दोन विश्वचषकातही बदल