पल्लेकेले येथे मंगळवारी (30 जुलै) खेळल्या गेलेल्या अत्यंत रोमहर्षक टी20 सामन्यात भारतानं श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघानं 3 सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा क्लिन स्वीप केला आहे.
तिसऱ्या सामन्यात एकवेळ श्रीलंकेचा संघ भारतीय संघावर पूर्णपणे वरचढ होता. मात्र भारतानं लंकेच्या जबड्यातून विजयाचा घास हिसकावला. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या 2 षटकांत सामना फिरवला, ज्यामुळे सामना टाय झाला आणि सुपर ओव्हर खेळवण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये भारतानं श्रीलंकेला कोणतीही संधी दिली नाही आणि संस्मरणीय विजय मिळवला.
या सामन्यात भारतासाठी रिंकू सिंहनं 19वं षटक टाकलं. तेव्हा श्रीलंकेला 12 चेंडूत फक्त 8 धावांची आवश्यकता होती. कर्णधार सूर्यानं जेव्हा रिंकूला ओव्हर दिला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यावेळी मोहम्मद सिराजचा एक ओव्हर शिल्लक होता. मात्र रिकूनं आपल्या कर्णधाराला बिलकूल निराश न करता अगदी टिच्चून गोलंदाजी केली. त्यानं या षटकात अवघ्या 3 धावा देत 2 गडी बाद केले.
सामना संपल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवला विचारण्यात आलं की, त्यानं रिंकूला 19वं षटक का दिलं? यावर सूर्यानं, रिंकू सिंहची गोलंदाजी परिस्थितीला अनुकूल होती, असं उत्तर दिलं. सूर्या म्हणाला, “20व्या षटकाचा निर्णय सोपा होता. मात्र सगळ्यात अवघड निर्णय होता 19वं षटक कोण टाकेल याचा. सिराज आणि अन्य काही गोलंदाजांचे ओव्हर बाकी होते, मात्र मला वाटलं की परिस्थितीनुसार, रिंकू सिंहची गोलंदाजी योग्य ठरेल. मी त्याची गोलंदाजी पाहिली आहे आणि नेट्समध्ये खूप सरावही केला आहे. त्यामुळे मला त्याच्याकडून गोलंदाजी करवणं योग्य वाटलं.”
या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवनं शेवटचा ओव्हर टाकला, ज्यामध्ये त्यानं केवळ 5 धावा दिला. यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरनं श्रीलंकेला अवघ्या 2 धावांवर रोखलं आणि भारतानं 3 धावांचं लक्ष्य पहिल्याच चेंडूवर गाठून संस्मरणीय विजय मिळवला.
हेही वाचा –
रिंकूचं 19वं षटक, सूर्याचं 20वं षटक अन् सुंदरनं सुपर ओव्हरमध्ये गेम केला! भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा संपूर्ण थरार
रिंकू-सूर्याची गोलंदाजी अन् सामना टाय! भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचा रोमहर्षक शेवट
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंकेच्या 16 सदस्यीय संघाची घोषणा, नेतृत्त्वपदी ‘या’ खेळाडूची वर्णी