---Advertisement---

राजस्थानचा ‘रॉयल’ रियान पराग इतका डोक्यात का जातोय? IPLच्या सामन्यात समालोचकांकडूनही खाल्लाय ओरडा

Riyan-Parag
---Advertisement---

आयपीएलच्या पहिल्या सिझननंतर तब्बल १४ वर्षांनी राजस्थान रॉयल्स आयपीएल फायनल खेळली.‌ अगदी विजयाच्या दारात असताना त्यांना पराभव पत्करावा लागला आणि दुसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न भंग पावले.‌ असे असले तरी हा प्रवास त्यांच्यासाठी विलक्षण राहिला. कारण, संघाने दाखवलेली एकजूट वाखाणण्याजोगी होती. संघातील प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून योगदान दिले. जे मोजके प्लेयर संपूर्ण १७ मॅचेस खेळले त्यापैकी एक होता युवा‌ ऑलराऊंडर रियान पराग. मागच्या चार वर्षांपासून राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा रियान, यावर्षी खूप चर्चेत राहिला.‌ मात्र, त्याची ही चर्चा त्याच्या कामगिरीसाठी नव्हे तर, वेगळ्याच कारणांची होती. खरंतर तो या सिझनला बदनाम झाला. मात्र, का? या प्रश्नाचे उत्तर देणारा हा लेख…

मूळ मुद्द्याला हात घालण्यापूर्वी रियान पराग कोण आणि त्याची पार्श्वभूमी काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. रियान आसामच्या गुवाहाटी येथील रहिवासी. त्याचे वडील पराग दास हे आसाम आणि रेल्वेसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणे, तर आई देखील नॅशनल रेकॉर्ड होल्डर स्विमर. खेळाची पार्श्वभूमी त्याच्या घरी पहिल्यापासूनच होती. मात्र, रियानचा कल क्रिकेट खेळण्याकडे होता. त्याच्यात टॅलेंट इतकं होतं की, १२ व्या वर्षीच त्याला अंडर १६ टीममध्ये जागा मिळाली. आपल्या कन्सिस्टंट परफॉर्मन्सने त्याने इंडियाच्या अंडर नाईन्टीन टीमपर्यंत मजल मारली. एवढंच काय वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी तो अंडर नाईन्टीन वर्ल्डकप जिंकणार्या टीम इंडियाचा भाग झाला. पृथ्वी शॉच्या नेतृत्वात यंग इंडियाने २०१८ मध्ये न्यूझीलंडमध्ये जिंकलेल्या ‌वर्ल्डकप वेळी तो संघाचा सदस्य होता.

त्याच्यातील ऑलराऊंड टॅलेंट पाहून राजस्थान रॉयल्सने त्याला, आयपीएल २०१९ ऑक्शनमध्ये शेवटच्या क्षणी आपल्या संघात सामील करून घेतले. पहिल्या सीजनच्या सेकंड हाफमध्ये त्याला राजस्थानने चान्स दिला. लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंगला येत त्याने एक फिफ्टी मारली. सिझनला त्याच्या १६० रन्स होत्या. गरज पडेल तेव्हा ऑफस्पिन देखील तो करायचा. आपल्याच बॅचच्या पृथ्वी शॉ, शुभमन गिल, अभिषेक शर्मा, शिवम मावी यांच्यासारखं त्यानेदेखील लक्ष वेधून घेतलं. मात्र, पुढचे दोन सिझन त्याच्या बॅटमधून रन्स आलेच नाहीत. दोन्ही सीजनमध्ये तो शंभरी पार करू शकला नाही. अर्थातच राजस्थानने त्याला रिटेन न करता रिलीज केले.

हेही पाहा- अफाट प्रतिभा असलेला Riyan Parag का होतोय टीकेचा धनी?

रियानचा परफार्मन्स पाहता त्याला जास्त मोठी बोली लागणार नाही, असे सर्वांना वाटत होते, पण मेगा ऑक्शनमध्ये वेगळेच घडले. राजस्थान आणि बंगलोर या दोन्ही रॉयल संघांमध्ये त्याच्यासाठी रस्सीखेच झाली आणि ३.८ कोटीच्या रकमेसह तो पुन्हा राजस्थानमध्ये सामील झाला. इतका विश्वास ठेवला म्हटल्यावर, रियान काहीतरी खास कामगिरी करेल अशी सर्वांना अपेक्षा होती.

सिझन सुरू झाला आणि राजस्थानच्या गाडीने स्पीड पकडला. सारेच अनुभवी प्लेयर आपला गेम दाखवत होते. मात्र, रियान शांत होता. त्याच्यावर भरपूर टीका होऊ लागली. फ्लॉप ठरतोय तरी का खेळवता? म्हणून राजस्थान मॅनेजमेंटवर देखील प्रश्नचिन्ह होते. अखेर रियानकडून आरसीबीविरुद्ध एक मॅच विनिंग फिफ्टी आली. हीच त्याच्या सिझनची हायलाईट.

बॅटिंग बॉलिंगमध्ये योगदान देता येत नसले तरी, फिल्डिंगमध्ये तो सर्वात अव्वल ठरला. सिझनमध्ये सर्वाधिक १७ कॅचेस त्याच्या नावे होते. पण, सर्वाधिक चर्चा झाली त्याच्या एटीट्यूडची. कोणताही कॅच घेतला की, तो अगदी आरामात घेतलाय असं दाखवून देताना त्याचा चेहरा पाहून अनेकांना राग यायचा. लखनऊ सुपरजायंट्सविरूद्ध मार्कस स्टॉयनिसचा एक अवघड कॅच त्याने पकडला. रियानने क्लीन कॅच असल्याचे सांगितले. मात्र, थर्ड अंपायर ब्रूस ऑक्सनफोर्ड यांनी बॉल जमिनीला लागल्याचे म्हटले. त्यावर रियान नाराज झाला.‌ योगायोगाने पुढच्या ओव्हरमध्ये मार्कस आऊट झाला, आणि त्याचा कॅच रियाननेच टिपला. त्याचा हा कॅच अत्यंत सोपा होता. मात्र, थर्ड अंपायरना खिजविण्यासाठी रियानने बॉल मुद्दाम जमिनीला टेकवला. त्याच्या या कृत्यावर मॅथ्यू हेडन आणि इयान बिशप या दिग्गजांनी भर कॉमेंट्रीत त्याला सुनावले. त्याने मर्यादा तर तेव्हा ओलांडली जेव्हा, आरसीबीविरुद्धच्या मॅचमध्ये हर्षल पटेलला त्याच्या बहिणीबद्दल त्याने अपशब्द वापरले. दुर्दैवाने आयपीएल सुरू असतानाच हर्षलच्या बहिणीचे निधन झाले होते.

चार वर्षे आयपीएल खेळूनही कधीही विश्वासू कामगिरी न केल्याने त्याच्यावर जोरदार टीका होतेय. आपला खेळ किती? आपला एटीट्यूड किती? अशाप्रकारे लोक त्याला ट्रोल करतायेत. अनेकांनी तर क्रिकेट इतिहासातील सर्वात इरिटेटिंग क्रिकेटर ही त्याला म्हटलेय. भारताचे अनेक माजी क्रिकेटर त्याला सुधारला पाहिजे म्हणून, सुनावताना दिसत आहेत.

रियान म्हणतो, त्याला विराट कोहलीसारखं व्हायला आवडेलं. मात्र खेळ, खेळ भावना आणि विरोधी खेळाडूंची कदर न केल्यास, लवकरच त्याला मिळत असलेल्या या संधीला देखील मुकावे लागू शकते. कारण, प्रत्येक क्रिकेटरने हे लक्षात ठेवले पाहिजे की, खेळामुळे आपण आहोत आपल्यामुळे खेळ नाही.

अफाट प्रतिभा असलेला Riyan Parag  का होतोय टीकेचा धनी? । IPL 2022 | Rajasthan Royals

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भारताची ऑलिम्पिक होप! शाळेसाठी खाचखळगे अन् काट्यांचा रस्ता तुडवणारा अविनाश साबळे नॅशनल रेकॉर्ड मोडतोय

जितकी चर्चा झाली, खरंच तितका वाद धोनी आणि सेहवागमध्ये होता का?

प्रतिभा असूनही मुंबई इंडियन्सने सलग दोन वर्षे अर्जुनला फक्त बेंच गरम करत का ठेवलंय?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---