---Advertisement---

…म्हणून गिल नाही, तर शॉची केली प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड; कर्णधार कोहलीने सांगितले कारण

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 7:58 AM
---Advertisement---

पाहुणा भारतीय संघ आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघ यांच्यात आजपासून (१७ डिसेंबर) पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे. ऍडलेडच्या मैदानावर होणाऱ्या या दिवसरात्र सामन्यासाठी एका दिवसापूर्वीच भारताीय संघाने प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने युवा फलंदाज शुबमन गिलऐवजी पृथ्वी शॉ याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे. अशात विराटने सराव सामन्यात अधिक चांगली फलंदाजी करणाऱ्या गिलऐवजी शॉला का संधी दिली?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कसोटी मालिकेच्या पाश्वभूमिवर खेळण्यात आलेल्या दोन्ही सराव सामन्यात मिळून शॉने ६२ धावा केल्या आहेत, तर गिलने शॉच्या दुपट्टीपेक्षा जास्त १३७ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे.

काय म्हणाला विराट कोहली?
शॉ याच्या कसोटी संघाच्या अंतिम पथकातील स्थानाविषयी बोलताना विराट म्हणाला की, “शॉ आणि गिल दोघेही प्रतिभाशाली खेळाडू आहेत. याच कारणामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्याची संधीही मिळाली आहे. गिलला आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण त्याला कसोटीत खेळताना पाहणे रोमांचक ठरेल. कारण तो आत्मविश्वासाने भरलेला एक युवा खेळाडू आहे.”

“शॉने यापूर्वी कसोटी पातळीवर चांगले प्रदर्शन केले आहे. तो यंदा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर कसोटी क्रिकेट खेळेल. पण क्रिकेटमधील त्याच्या प्रगतीला पाहण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. तसेच ही संघातील अनुभवी खेळाडूंनी जबाबदारीने खेळण्याची वेळ आहे. मला विश्वास आहे, ते ही जबाबदारी चोखपणे पार पाडतील,” असे पुढे बोलताना विराटने सांगितले.

केवळ एका सामन्यात खेळणार विराट
महत्त्वाचे म्हणजे, विराट चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील केवळ प्रकाशझोतातील पहिला सामनाच खेळणार आहे. त्यानंतर पालकत्त्व रजेमुळे तो भारतात परतेल. अशात उर्वरित तीन सामन्यात संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या हातात नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात येतील.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन
विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---