वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (WIvENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा एनक्रुमाह बोनरच्या (१२३) शतकाच्या जोरावर यजमानांनी ६२ धावांची आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजने ९ गड्यांच्या मोबदल्यात ३७३ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी, इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात ३११ धावा केल्या होत्या.
यजमानांसाठी तिसऱ्या दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही. जेसन होल्डर लवकरच ४५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर यष्टीरक्षक दा सिल्वा (३२), केमार रोच (१६) आणि वीरसामी पेरमॉल (नाबाद २६) यांनी जास्तीत जास्त चेंडू खेळले आणि दुसऱ्या टोकाला बोनरला चांगली साथ दिली. ज्यामुळे संघाला आघाडी मिळविण्यात यश आले.
वेस्ट इंडिजला दिवसातील अखेरचा धक्का बोनरच्या रूपाने बसला. त्याला १२३ धावांवर लॉरेन्सने बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बोनरने या खेळीत ३५५ चेंडूंचा सामना करताना १२ चौकार आणि एक गगनचुंबी षटकार लगावला.
तिसरा दिवस इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी खडतर ठरला. मार्क वुडच्या दुखापतीनंतर इतर गोलंदाजांवर दबाव वाढला. वुडच्या दुखापतीमुळे जॅक लीचने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात ४३ षटके टाकली. क्रेग ओव्हरटनने ३२, ख्रिस वोक्सने ३० आणि बेन स्टोक्सने २८ षटके टाकली. स्टोक्स व ओव्हरटन यांनी प्रत्येकी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.
तत्पूर्वी, पहिल्या डावात खराब सुरुवातीनंतर इंग्लंड संघाने शानदार पुनरागमन केले. मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज जॉनी बेअरस्टोने एकाकी झुंज देत शतक झळकावून संघाला ३११ पर्यंत मजल मारून दिली होती.
महत्वाच्या बातम्या-