टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहानं क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो बराच काळ भारताच्या कसोटी संघाचा सदस्य होता. परंतु नंतर खराब फॉर्ममुळे त्याला वगळण्यात आलं. यानंतरही तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय होता. आता त्यानं निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या जारी रणजी ट्रॉफी ही त्याची व्यावसायिक क्रिकेटमधील शेवटची स्पर्धा असेल.
वृद्धीमान साहा यानं त्याच्या एक्स अकाउंटवरून ही माहिती दिली. त्यानं लिहिलं, “क्रिकेटमधील संस्मरणीय प्रवासानंतर हा रणजी हंगाम माझा शेवटचा असेल. निवृत्तीपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये खेळून बंगालचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो. आता हा हंगाम संस्मरणीय बनवूया!”
40 वर्षीय वृद्धिमान साहाच्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात 2010 मध्ये झाली होती. त्यावेळी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली. त्यानं फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2021 पर्यंत भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यानं 3 शतकं आणि 6 अर्धशतकांसह 1353 धावा केल्या. यष्टिरक्षक म्हणून त्यानं 92 झेल आणि 12 स्टंपिंग केल्या. मात्र, त्याची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्द खराब होती. 2010 ते 2014 या चार वर्षात त्यानं 9 एकदिवसीय सामने खेळले, ज्याच्या पाच डावात त्याला केवळ 41 धावा करता आल्या.
साहाला प्रथम श्रेणी क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. तो 2007 पासून आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. बंगाल व्यतिरिक्त तो त्रिपुराकडून खेळला आहे. त्यानं 138 सामन्यांच्या 203 डावांमध्ये 35 वेळा नाबाद राहून एकूण 7013 धावा केल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं द्विशतकही झळकावलं आहे. येथे त्यानं 41.74 ची सरासरी आणि 48.53 च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या. याशिवाय त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 14 शतकं आणि 43 अर्धशतकं झळकावली आहेत.
हेही वाचा –
विराट-रोहित सारख्या दिग्गजांनी दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार दिला होता, कारण धक्कादायक!
‘ते अजूनही खेळाडूंना समजून घेतायत’, कसोटी मालिका गमावल्यानंतर कोचिंग स्टाफबद्दल रोहितचे मत
गौतम गंभीर आणि रोहित शर्माच्या रणनितीवर संतापले संजय मांजरेकर, पराभवावर काय म्हणाले?