वनडे विश्वचषक 2023 दरम्यान भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याला सुरुवातीच्या 2 सामन्यांत संधी मिळाली होती. मात्र, त्यानंतर त्याला पुढे संधी मिळाली नाही. असे असले, तरीही त्याला तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळावर काम करण्याची संधी मिळाली. त्याने नेट्समध्ये फलंदाजीचा चांगला सराव केला आणि यादरम्यान त्याने सामन्यातील परिस्थितीनुसार काही गोलंदाजांविरुद्ध कसे खेळायचे, हेही लक्षात घेतले. गुरुवारी (दि. 23 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यादरम्यान 25 वर्षीय किशनला मेहनतीचे फळ मिळाले. त्याने फिरकीपटू तन्वीर संघा याला निशाणा बनवत त्याच्या 10 चेंडूत 30 धावा केल्या. अशात त्याने याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.
इशान किशनचे विधान
इशान किशन (Ishan Kishan) याने सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने म्हटले की, “विश्वचषकादरम्यान जेव्हा मी खेळत नव्हतो, तेव्हा मी प्रत्येक सराव सत्रापूर्वी स्वत:ला विचारायचो की, माझ्यासाठी महत्त्वाचे काय आहे? मी काय करू शकतो? मी नेटवर खूप सराव केला. मी प्रशिक्षकांशी सातत्याने खेळाविषयी बोलत होतो की, सामन्याला शेवटपर्यंत कसे नेता येईल, काही खास गोलंदाजांना कसा निशाणा बनवला जाईल.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “फिरकीपटूंविरुद्ध डावखुऱ्या हाताचा फलंदाज असल्यामुळे मला स्थिती चांगल्याप्रकारे माहिती होती. मला माहिती होते की, खेळपट्टी कशी आहे. कारण मी 20 षटकांपर्यंत क्षेत्ररक्षण केले होते. जेव्हा तुम्ही 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्हाला एका गोलंदाजाला निशाणा बनवायचे असते, ज्याच्याविरुद्ध तुम्ही मोठे फटके खेळू शकता. माझी सूर्या भाईशी चर्चा झाली होती की, मी या खेळाडूविरुद्ध (तन्वीर संघा) मोठे शॉट खेळेल. मग त्याने कितीही गोलंदाजी करो. कारण, आपल्याला धावा आणि चेंडू यांच्यातील अंतर कमी करायचे आहे.”
किशन म्हणाला, “तुम्ही तळातील फलंदाजांसाठी जास्त धावा ठेवू शकत नाहीत. त्यांच्यासाठी सरळ येऊन मोठे शॉट खेळणे सोपे नसेल. मला जोखीम घ्यायची होती आणि मला स्वत:वर विश्वास होता.”
ऑस्ट्रेलियाच्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 2 विकेट्स लवकर घालवण्याविषयी किशन म्हणाला, “आम्ही दोन विकेट्स लवकर गमावल्या आणि भागीदारी महत्त्वाची होती. मी आयपीएलमध्येही सूर्या भाईसोबत एकाच संघाकडून खेळलो होतो, त्यामुळे मला माहिती आहे की, तो कसे खेळतो, कोणते शॉट खेळू शकतो. मला वाटते की, आज मैदानावरील चर्चा खूप चांगली होती. आम्ही एकमेकांशी चर्चा करत होतो की, कोणत्या गोलंदाजाला निशाण्यावर घ्यायचे आहे, आपल्याला स्ट्राईक रोटेट करत राहायचे आहे.”
भारतीय संघाने आव्हानाचा पाठलाग करताना किशनच्या 39 चेंडूत 58 धावा आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या 42 चेंडूत 80 धावांच्या जोरावर 1 चेंडू आणि 2 विकेट्स शिल्लक ठेवत गाठले. यासोबतच भारताने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. (wicketkeer batsman ishan kishan take on australian spinner tanveer sangha by saying this to suryakumar yadav revealed himself)
हेही वाचा-
टीम इंडियातून बाहेर असलेल्या संजू सॅमसनचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘लोक मला सर्वात दुर्दैवी क्रिकेटर…’
सामना एक, विक्रम अनेक! IND vs AUS पहिल्या टी20त बनले 10 जबरदस्त Records, सूर्याने ‘हिटमॅन’ला पछाडलं