भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) केवळ 8 महिन्यांच्या आत दोनदा निवृत्ती घेतली आहे. प्रथम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने आंतरराष्ट्रीय करिअरला विराम दिला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याने IPL मधूनही निवृत्ती जाहीर केली. मात्र आता क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार अश्विन इंटरनॅशनल लीग T20 (ILT20) खेळण्याच्या तयारीत असून यासाठी तो ऑक्शनमध्ये नाव नोंदवणार आहे.
ILT20 ही लीग संयुक्त अरब अमिरात (UAE) येथे खेळली जाते. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, लीग आयोजक आणि अश्विन यांच्यात चर्चा देखील झाली आहे. नावनोंदणीच्या औपचारिकता पूर्ण झाल्यावर अश्विनचे नाव ऑक्शन लिस्टमध्ये झळकू शकते. ऑक्शनसाठी नावे नोंदवण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर आहे.
रिपोर्टनुसार अश्विन म्हणाला, हो, मी आयोजकांच्या संपर्कात आहे. आशा आहे की जर मी ऑक्शनमध्ये गेलो तर मला खरेदीदार नक्कीच मिळेल. यापूर्वी या लीगमध्ये खेळाडूंना निवडण्यासाठी ड्राफ्ट सिस्टीम वापरली जात होती, मात्र येत्या हंगामासाठी ऑक्शन प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. हे ऑक्शन 30 सप्टेंबर रोजी दुबई येथे होणार आहे.
हा ILT20 चा चौथा सीझन असणार आहे. जर अश्विनवर बोली लागली तर UAE लीगसाठी ही मोठी बातमी ठरेल. याआधी फक्त 3 भारतीय खेळाडूंनी या लीगमध्ये सहभाग घेतला आहे. रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू आणि युसूफ पठाण. अश्विनकडे भरपूर अनुभव आहे. IPL मध्ये तो दीर्घकाळ मॅच विनर ठरला आहे. त्याच्या T20 करिअरमधील 333 सामन्यांमध्ये त्याने 317 बळी घेतले आहेत आणि 1233 धावा केल्या आहेत.






