भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना 17 डिसेंबर रोजी लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होणार होता. मात्र, दाट धुक्यामुळे हा सामना खेळवणे तर लांबच, पण साधा टॉस देखील होऊ शकला नाही. संध्याकाळी 7 वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याबाबत अंपायर्सनी रात्री 9:30 वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता स्टेडियममध्ये आलेल्या चाहत्यांना तिकिटाचे पैसे परत मिळतील का? याबाबत बीसीसीआयने (BCCI) भूमिका स्पष्ट केली आहे.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, जर सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला, तर तिकीट धारकांना (काही शुल्क वजा करून) रिफंड (पैसे परत) मिळण्याचा अधिकार असतो. यावर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी माहिती दिली की, रिफंड देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (UPCA) अखत्यारीत येतो. या सामन्याचे यजमानपद ‘यूपीसीए’ कडे असल्यामुळे तिकिटांशी संबंधित सर्व निर्णय आणि कार्यवाही तेच करतील. बीसीसीआय फक्त सामने आयोजित करण्याचे अधिकार देते, पण तिकीट विक्री आणि रिफंडची व्यवस्था राज्य संघटना पाहते.
भारतीय संघ सध्या या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारताने पहिला सामना जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. तिसऱ्या सामन्यात भारताने जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. आता पाचवा सामना जिंकल्यास भारत मालिका खिशात घालेल, तर दक्षिण आफ्रिकेला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल.






