इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९ व्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळणारा अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर रशीद खानने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत एक मोठे विधान केले आहे. रशीद खान गेल्या काही वर्षांपासून सतत पाठदुखीच्या (Back Injury) समस्येशी झुंज देताना दिसत आहे, ज्यामुळे तो केवळ मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील महत्त्वाच्या मालिकांमध्ये सहभागी होत होता. हेच लक्षात घेऊन रशीद खानने आता जे विधान केले आहे, त्यातून असे संकेत दिले आहेत की, आयपीएल २०२६ संपल्यानंतर जून महिन्यात भारताविरुद्ध मुल्लानपूर येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यातून तो बाहेर राहू शकतो.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सला मिळालेल्या एक धावेच्या विजयानंतर रशीद खानने आपल्या दुखापतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. तो म्हणाला, “ऑपरेशननंतर आता मी नक्कीच पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहे, पण डॉक्टरांनी मला गंमतीने सांगितले की, जर तुला क्रिकेट खेळायचे नसेल, तर तू कसोटी क्रिकेट खेळत राहा. मला वनडे क्रिकेटमध्ये आनंद मिळतो आणि जर मी कसोटी क्रिकेटपासून दूर राहिलो, तर मी अफगाणिस्तानसाठी जास्त काळ खेळू शकेन.” याचवेळी जेव्हा त्याला भारताविरुद्धच्या एकमेव कसोटीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, “जर मी वर्षातून एक कसोटी खेळत असेल, तर ती मी २०२५ मध्ये खेळलो आहे. डॉक्टरांनी मला सर्वप्रथम कसोटी क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले होते, तरीही मी झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी खेळलो आणि त्यात ५४ षटके गोलंदाजी करत ११ बळी घेतले होते.”
कसोटी क्रिकेटपासून दूर राहण्याबाबत रशीद खान पुढे म्हणाला की, “जर मी भारताविरुद्धच्या कसोटीत खेळलो आणि माझ्या पाठीचा त्रास पुन्हा सुरू झाला, तर मी काय करणार? जर मी वर्षातून फक्त एकच कसोटी खेळत असेल, तर मी काही १०० कसोटी सामने खेळणार नाहीये. सध्या माझे पूर्ण लक्ष २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीवर आहे, ज्यासाठी मला माझ्या फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करायचा नाहीये.”






