---Advertisement---

…आणि हाती लागला शून्य! भारतभूमीवर सर्वात लाजिरवाणा विक्रम करून जाणार ‘हा’ किवी गोलंदाज

On: सोमवार, डिसेंबर 6, 2021 1:30 AM
---Advertisement---

सध्या न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आहे. भारताविरुद्ध न्यूझीलंड संघाने तीन सामन्याची टी२० मालिका खेळली. तसेच कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सध्या मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेत्या न्यूझीलंड संघासाठी हा भारत दौरा खूपच निराशाजनक राहिला. संघातील खेळाडू या दौऱ्यावर अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. यामध्ये न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज विल समरविल याने तर चाहत्यांची खूपच निराशा केली. समरविलने दुसऱ्या कसोटी सामन्यात एका नकोशा विक्रमाची नोंद स्वतःच्या नावावर केली.

समरविल भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या (कानपूर) आणि दुसऱ्या (मुंबई) या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहभागी होता. तो या दोन्ही कसोटी सामन्यात अपयशी ठरला. त्याने दोन्ही सामन्यांमध्ये एकही विकेट घेतली नाही. याचसोबत त्याने या खराब प्रदर्शनाच्या जोरावर एका नवीन आणि नकोशा विक्रमाची नोंद केली. समरविल भारताविरुद्ध कसोटी मालिकेत एकही विकेट न घेता सर्वाधिक चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने या दौऱ्यात भारताविरुद्ध खेळलेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमधील चार डावात एकूण ४१४ चेंडू टाकले आणि एकही विकेट घेतली नाही.

यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलिया संघाचे माजी वेगवान गोलंदाज ऍलन हर्स्ट यांच्या नावावर होता. ऍलन हर्स्ट यांनी १९७९ साली ऑस्ट्रेलिया संघासोबत भारताचा दौरा केला होता. त्यांनी या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या चेन्नई आणि बेंगलोर या दोन्ही कसोटी सामन्यात सहभाग घेतला होता. यात ते एकही विकेट घेऊ शकले नव्हते. त्यांनी या दोन सामन्यांच्या चार डावात एकूण ५२ षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्यांनी ३१२ चेंडू टाकले आणि एकही विकेट घेतली नाही. आता समरवीलने ऍलन यांचा हा विक्रम मोडीत काढला आहे.

दरम्यान, उभय संघात खेळला जात असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. भारताने त्यांचा दुसरा डाव ७ बाद २७६ धावांवर घोषित केला होता आणि न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी तब्बल ५४० धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने ५ बाद १४० धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---