आज विम्बल्डन २०१७चा अंतिम सामना ७ वेळचा विजेता रॉजर फेडरर आणि २०१४ चा अमेरिकन ओपन विजेता मारिन चिलीच यांच्यात होणार आहे. फेडरर आपले ८वे विम्बल्डन विजेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे तर मारिन या टेनिस किंगला धक्का देऊन आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद जिंकतो का गे पाहणे महत्वाचे ठरेल.
फेडररने २००३, २००४, २००५, २००६, २००७, २००९ व २०१२ मध्ये येथे विजेतेपद मिळवले आहे. ही त्याची १२ विम्बल्डन अंतिम फेरी आहे, विशेष म्हणजे हा ३५ वर्षीय खेळाडू एकही सेट यावेळी स्पर्धेत हरला नाही. फेडररने जर आज विजेतेपद मिळवले तर पिट सम्प्रास यांचा विक्रम मागे टाकून ८वेळा विम्बल्डन जिंकणारा एकमेव खेळाडू बनेल.
२८ वर्षीय युवा खेळाडू मारिन चिलीचसुद्धा आपल्या पहिल्या विम्बल्डन विजेतेपदासाठी उत्सुक आहे. त्याने २०१४ साली अमेरिकन ओपन हे एकमेव ग्रँडस्लम जिंकले असून आज होणारी अंतिम फेरी ही केवळ त्याची दुसरी ग्रँडस्लॅम अंतिम फेरी आहे.
आतापर्यंत फेडररने चिलिचविरुद्ध सात सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे.
भारतीय वेळेनुसार हा सामना संध्यकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार आहे.