मुंबई । क्रिकेटच्या घडामोडीची माहिती देणारे प्रसिद्ध मासिक विस्डेनने 21व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. विस्डेनने सर्व परिस्थितीचे आकलन करून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील 30 खेळाडूंची यादी बनवली आहे. यातील कसोटी क्रिकेटमधील निवडण्यात आलेली काही नावे आश्चर्यचकीत करणारी आहेत. या यादीत श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथैय्या मुरलीधरन याचे नाव पहिल्या स्थानावर आहे.
विस्डेनच्या टॉप टेन कसोटी यादीत दोन भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यात रवींद्र जडेजा दुसऱ्या तर आर अश्विन हा आठव्या स्थानावर आहे. या दोन्ही खेळाडूंबरोबरच कर्णधार विराट कोहली हा अठराव्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ या यादीत तिसऱ्या स्थानावर आणि माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राला चौथे स्थान देण्यात आले आहे.
टॉप टेनमध्ये कसोटी खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉक आणि जॅक कॅलिस यांची देखील नावे आहेत. तसेच बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनची देखील निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि शेन वॉर्न यांना देखील स्थान देण्यात आले आहे.
विस्डेनने निवडलेल्या वनडे क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचे नाव गायब आहे. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके ठोकले आहे. असा कारनामा करणारा तो जगातला पहिला खेळाडू आहे. त्याचे नाव नसल्याने क्रिकेट चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
वनडे क्रिकेटच्या यादीत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अँड्रयू फ्लिंटॉला पहिल्या स्थानावर ठेवण्यात आले आहे तर शाकीब अल हसन दुसऱ्या स्थानावर आहे. टॉप टेन खेळाडूंच्या यादीत विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू आहे. जो या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
एबी डिव्हिलियर्स चौथ्या, केन विल्यम्सन पाचव्या, शॉन पोलॉक सातव्या स्थानावर आहेत. हशिम आमला, नाथन ब्रेकन, जॅक कॅलिस यांना देखील निवडण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या यादीत सचिन तेंडुलकर 22 व्या स्थानावर आहे.
टी 20 क्रिकेटच्या यादीत अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खान हा पहिल्या क्रमांकावर आहे. राशिदने आपल्या फिरकी गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुसऱ्या स्थानावर आहे तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा तिसर्या तर वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल सहाव्या स्थानावर आहे.
ऍनालिसिस कंपनी क्रिकविजने ही यादी तयार केली आहे. ही यादी तयार करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला एक खास एमपीव्ही रेटिंग देण्यात आली आहे. या आकड्यांच्या मदतीने प्रत्येक खेळाडूचा सामन्यात किती फरक पडला याचा विचार करून ही यादी निवडण्यात आली.
विस्डेन क्रिकेट मंथलीचे मुख्य कार्यकारी संपादक फिल वॉकर म्हणाले की, “फ्लिंटॉफ डेथ ओव्हर्स मधला तज्ज्ञ गोलंदाज होता. फलंदाजीतही त्याने कमालीचे प्रदर्शन केले. 2003-04 या दरम्यान त्याने 51च्या सरासरीने 1264 धावा केल्या आहेत. यासोबत 20च्या सरासरीने 41 बळी टिपले. या आकडेवरून वरून त्याचे महत्त्व लक्षात येते.”