महिला टी20 विश्वचषक 2024 च्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 58 धावांनी पराभव केला. या पराभवासह भारताच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
वास्तविक, टी20 विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या धावांच्या बाबतीत भारतीय महिला संघाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. एकंदरीत पाहिलं तर भारताचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अवघ्या 102 धावांवर ऑलआऊट झाला.
महिला टी20 विश्वचषकात धावांच्या बाबतीत भारताचा सर्वात मोठा पराभव ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. 2020 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 85 धावांनी पराभव केला होता. आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 58 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. 2009 मध्ये ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून 52 धावांनी पराभव झाला होता. हा भारताचा तिसरा सर्वात मोठा पराभव आहे.
या सामन्यात न्यूझीलंडनं भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 160 धावा केल्या. संघाकडून कर्णधार सोफी डिव्हाईननं दमदार कामगिरी केली. तिनं नाबाद 57 धावा केल्या. सोफीनं 36 चेंडूंचा सामना करत 7 चौकार मारले. प्रत्युत्तरात टीम इंडिया 102 धावांवर ऑलआऊट झाली. भारताकडून कर्णधार हरमनप्रीतनं सर्वाधिक 15 धावा केल्या. तिनं 14 चेंडूंचा सामना केला आणि 2 चौकार मारले.
महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचा पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना रविवारी संध्याकाळी दुबईत होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाला बरीच तयारी करावी लागणार आहे. भारताचा शेवटचा गट सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना 13 ऑक्टोबरला शारजाहमध्ये खेळला जाईल. विश्वचषकाचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
हेही वाचा –
न्यूझीलंडनंतर आता भारतासमोर पाकिस्तानचे आव्हान, सामन्यापूर्वी पाहा हेड टू हेड रेकाॅर्ड
‘आता आमच्यासाठी…’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
न्यूझीलंडविरुद्धचा हा पराभव भारताला भारी पडणार? टीम इंडियाची पुढील वाट खुपचं खडतर