महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला. मात्र या विजयानंतरही भारताच्या अडचणी कायम आहेत. टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठणं अजूनही कठीण आहे. भारतीय संघाला पाकिस्तानचा मोठ्या फरकानं पराभव करून ही समस्या सोपी करता आली असती, परंतु तसं झालं नाही. आता भारताला आपले बहुतेक सामने जिंकावेच लागतील. याशिवाय न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया आपले सामने गमावतील, अशी आशाही बाळगावी लागेल.
महिला टी20 विश्वचषकात भारताचं उपांत्य फेरी गाठण्याचं संपूर्ण समीकरण आता नेट रनरेटवर अडकलेलं दिसतं. हे आपण सविस्तर समजून घेऊ. महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ ‘अ’ गटात आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संघही आहेत. श्रीलंका वगळता सर्व संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलाय. अशाप्रकारे भारतासह न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचेही गुणतालिकेत प्रत्येकी दोन गुण आहेत. यापैकी गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी प्रत्येकी एकच सामना खेळला आहे. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांचा एक पराभव आणि एक विजय आहे. अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडची स्थिती चांगली आहे. यापैकी एक संघ 8 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. उर्वरित संघ जास्तीत जास्त 6 गुणांपर्यंत पोहोचू शकतील.
भारतीय संघ पहिला सामना न्यूझीलंडकडून हरला असून दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. अशा परिस्थितीत भारताला 6 गुणांपर्यंत पोहोचायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. भारताचा आता 9 ऑक्टोबरला श्रीलंका आणि 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना आहे. यापैकी एका जरी सामन्यात पराभव झाला, तर भारतीय संघ पूर्णपणे नशिबावर अवलंबून राहील.
टीम इंडियानं श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास त्यांचे 6 गुण होतील. पण न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियाचेही 6 किंवा त्याहून अधिक गुण होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीचा निकाल नेट रनरेटवर अवलंबून राहील. सध्या भारताचा नेट रन रेट -1.217 आहे. न्यूझीलंड (2.900), ऑस्ट्रेलिया (1.908) आणि पाकिस्तान (0.555) यांचा धावगती भारतापेक्षा चांगली आहे. श्रीलंकेचा (-1.667) रन रेट सर्वात कमी आहे आणि त्यांचे खाते अद्याप उघडलेले नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवार, 6 ऑक्टोबर रोजी मुकाबला झाला. या सामन्यात पाकिस्ताननं भारताला 106 धावांचं छोटेखानी लक्ष्य दिलं होतं. भारताने 18.5 षटकांत 4 गडी गमावून विजय मिळवला. या विजयातून भारताला दोन गुण मिळाले, मात्र रनरेटमध्ये फारसा फरक पडला नाही. भारतानं पाकिस्तानचा 11.2 षटकांत पराभव केला असता तर संघाचा रनरेट चांगला झाला असता, परंतु हरमनप्रीत कौरच्या संघाला तसं करता आलं नाही.
हेही वाचा –
प्रीती झिंटाच्या संघानं जिंकली पहिली टी20 ट्रॉफी, आरसीबी कर्णधाराच्या नेतृत्वात कमाल कामगिरी!
पहिला ओव्हर मेडन, दुसऱ्यामध्ये विकेट! मयंक यादवनं पदार्पणातच केलं भल्या-भल्यांना गार!
‘सिक्सर किंग’ सूर्या! जोस बटलरला टाकलं मागे, आता रोहितचा रेकॉर्ड निशाण्यावर