Mitali Raj Advice To Team India : भारतीय महिला संघासाठी श्रीलंकेविरुद्धचा आशिया चषक 2024 चा अंतिम सामना वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय संघाने महत्त्वाच्या सामन्यात भरपूर चुका केल्या. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर स्मृती मंधाला हिला वगळता इतर फलंदाजांना विशेष खेळ करता आला नाही. स्मृतीच्या 60 धावांच्या (47 चेंडू) खेळीच्या जोरावर भारतीय संघ श्रीलंकेला 166 धावांचे आव्हान देऊ शकला.
मात्र प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाज श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरल्या. तसेच भारतीय खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे श्रीलंकेच्या संघाने 18.4 षटकातच 8 विकेट्स शिल्लक असताना सामना खिशात घातला. यासह श्रीलंकेचा महिला संघ पहिल्यांदाच आशिया चषक विजेता ठरला. तर भारतीय़ संघाची आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याची संधी हुकली. यानंतर माजी भारतीय कर्णधार मिताली राज हिने भारतीय खेळाडूंना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. आगामी टी20 विश्वचषक डोळ्यांसमोर ठेवूनही मितालीने काही गोष्टी सांगितल्या आहेत.
‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना मिताली राज म्हणाली, “येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतीय संघ टी20 विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर अधिक काम करणे गरजेचे आहे. ही त्यांची कमकुवत बाजू आहे. भारत अद्याप तिसऱ्या क्रमाकांसाठी योग्य फलंदाजाच्या शोधात आहे. उमा छेत्री आणि हेमलथा यांचा प्रयोग करून झाला पण तितकेसे यश आले नाही. सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही जोडी बाद झाल्यानंतर डाव सांभाळण्यासाठी कोणीतरी असायला हवे.”
“भारताने पाचऐवजी सहा गोलंदाज खेळवायला हवेत. यात अष्टपैलूंचा समावेश असेल. आगामी काळात भारतीय संघाने अधिक चांगले क्रिकेट खेळायला हवे. त्यांना चांगली संधी आहे कारण विश्वचषकाची स्पर्धा बांगलादेशात होत आहे. तेथील खेळपट्टी आणि तेथील वातावरण भारतीय फलंदाजांना मदत करू शकते. भारतीय संघाची ताकद ही नेहमीच फिरकी गोलंदाजी राहिली आहे. त्यामुळे त्यांनी चांगले क्रिकेट खेळून स्पर्धा जिंकावी”, असे मिताली राजने सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाबाहेर असलेल्या पृथ्वीचा इंग्लंडमध्ये जबरदस्त ‘शो’, केवळ इतक्या चेंडूत फटकावल्या 76 धावा
नेहराने यशस्वी जयस्वालची घेतली फिरकी; म्हणाला, “रोहित-विराट असते तर, तू नेटमध्ये…”
स्टीव्ह स्मिथच्या संघानं उंचावली मेजर लीग क्रिकेटची ट्राॅफी…!!!