यंदाच्या महिला आशिया कपमध्ये (Women’s Asia Cup) भारतानं सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून थेट सेमीफायनलमध्ये धडक मारली. आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुवा उडवून विजयाला सुरुवात केली होती. आता दुसऱ्या सामन्यात रिचा घोष (Richa Ghosh) आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या झंझावाती अर्धशतकामुळे भारतानं युएई संघाचा 78 धावांनी दारुण पराभव केला.
तत्पूर्वी युएईनं टाॅस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात भारतानं 5 गडी गमावून 201 धावा ठोकल्या. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरनं 66 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. ज्यामध्ये तिनं 7 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार लगावला. तर यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषनं (Richa Ghosh) नाबाद 64 धावांची खेळी केली. शफाली वर्मा 37, जेमीमाह राॅड्रीग्ज 14 आणि स्म्रीती मानधनाच्या 13 धावांच्या जोरावर भारतानं युएईसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
युएईसाठी कविशा इगोडगेनं सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या तर हीना होतचंदानी आणि समायरा धरणीधरका यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
भारतानं दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना युएई संघ 123 धावाच करु शकला. त्यामध्ये कविशा इगोडगेनं 32 चेंडूत 40 धावांची खेळी केली. तिच्या खेळीत तिनं 3 चौकार तर 1 षटकार लगावला. तर कर्णधार ईशा रोहित ओझानं 38 धावांची खेळी केली. परंतू संघाला सामना जिंकून देऊ शकले नाहीत.
भारतासाठी दीप्ती शर्मानं सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर रेणुका ठाकुर सिंह, तनुजा कनवर, पुजा वस्त्राकर, राधा यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेऊन भारताला सामना जिंकून दिला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार 64 धावांची नाबाद आक्रमक खेळी केलेल्या रिचा घोषला (Richa Ghosh) देण्यात आला. या विजयासह भारतानं सेमीफायनलमध्ये एँट्री केली.
महत्त्वाच्या बातम्या-
मोर्ने मोर्केल नाही! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाला मिळाले नवे गोलंदाजी प्रशिक्षक
RCBच्या माजी सलामीवीराची विस्फोटक खेळी, ठोकल्या 30 चेंडूत 77 धावा
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिननं काढली आचरेकर सरांची आठवण, सोशल मीडियावर केली खास पोस्ट शेअर