भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये इतिहास घडवला. काही लोकांनी मिताली राजच्या स्ट्राइक रेटवर टीका केली होती. त्यांना मितलीने दमदार उत्तर दिले आहे. इतके दिवस खेळल्यानंतर मितालीला लोकांना पुरावा देण्याची गरज नसल्यचे तिने सांगितले आहे.
मितालीने 89 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली आणि भारताने इंग्लंड संघाला मालिकेच्या तिसर्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात चार गडी राखून पराभूत केले. या खेळीदरम्यान मिताली महिला क्रिकेटच्या सर्व प्रकारात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरली.
हा सामना झाल्यानंतर आभासी पत्रकार परिषदेत मिताली राजला स्ट्राईक रेटबद्दल केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “माझ्यावर स्ट्राईक रेटवर होणाऱ्या टीकांबद्दल मी वाचले आहे. मी याबद्दल या अगोदरही बोलले आहे की, मला लोकांना माझ्या कामगिरीचे पुरावे द्यायची गरज वाटत नाही. मी बर्याच दिवसांपासून खेळत आहे आणि मला माहित आहे की संघात माझी एक महत्वाची जबाबदारी आहे. माझे ध्येय लोकांना खुश करायचे नसून संघ व्यवस्थापनाने मला नेमलेल्या भूमिकेसाठी मी येथे आहे. जेव्हा आपण ध्येयाचा पाठलाग करत असतो. तेव्हा गोलंदाजाची निवड करण्यापेक्षा आपण आपल्या स्वत:च्या मजबूत बाजूवर विश्वास ठेवला पाहिजे.”
मिताली राज पुढे म्हणाली की, “धावा बनवण्याची भूक अजूनही तशीच आहे, जशी 22 वर्षांपूर्वी होती. पुढच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी माझ्या फलंदाजीला नवीन उंचावर नेण्याच्या प्रयत्न करत आहे. माझा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. स्वतःची परीक्षा आणि बरीचशी आव्हाने होती. माझा आधीपासूनच असा विश्वास आहे की, परीक्षांचा उद्देश ठेवला पाहिजे.”
मिताली पुढे म्हणाले की, “एक वेळ अशी देखील आली होती की, विविध कारणांमुळे मला असे वाटत होते की आता बस झाले. परंतु ही अशी एक गोष्ट होती जी मी सतत खेळत राहिले आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्षे झाली आहेत. पण माझी धावांची भूक कमी झाली नाही. मला अजूनही तशीच आवड आहे. मैदानावर येऊन भारतासाठी सामने जिंकणे आणि जिथपर्यंत माझ्या फलंदाजीचा प्रश्न आहे, मला वाटते की अजूनही माझ्या फलंदाजीत सुधारणेची गरज आहे. मी त्यावर सतत कामही करत आहे. असे काही पैलू आहेत, जे मला माझ्या फलंदाजीत जोडायचे आहेत.”
मितालीने 2019 मध्ये टी20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. 4 मार्च ते 3 एप्रिल 2022 या कालावधीत न्यूझीलंडमध्ये होणारी महिला विश्वचषक ही तिची शेवटची स्पर्धा असल्याचे तिने आधीच सांगितले आहे. सध्या मिताली 38 वर्षांची असून फलंदाजीतील आपली भूमिकेचा आनंद लुटत आहे आणि इतर खेळाडूंना देखील मार्गदर्शन करत आहे.
इतकेच नव्हे तर मितालीने अष्टपैलू खेळाडू स्नेह राणाचेही कौतुक केले. तिच्याबरोबर तिने सातव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 50 धावांची भागीदारी केली होती. मिताली म्हणाली की, “स्नेह राणाला श्रेय देणे महत्वाचे आहे. कारण ती भागीदारी महत्त्वपूर्ण होती. अर्थात, आम्हाला त्या स्थितीत असा खेळाडू हवा होता जो लांब शॉट्स खेळू शकेल आणि काही षटके गोलंदाजीही करु शकेल. म्हणून तिचे संघात असणे चांगले आहे. एक चांगला खेळाडू होण्याची तीव्र इच्छा असल्याचे तिने दाखवून दिले. आजच्या क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका महत्वाची आहे.”
एकदिवसीय संघाची उपकर्णधार आणि टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर लवकरच फॉर्मात परत येतील अशी आशा मितालीने व्यक्त केली. मिताली म्हणाली की, “हे कोणत्याही खेळाडूबद्दल होऊ शकते. कधीकधी आपण फॉर्ममध्ये नसतो परंतु एक संघ म्हणून आपल्याला सामना जिंकणारा खेळाडूला पाठिंबा द्यावा लागतो. आम्हाला माहित आहे की, तिने स्वतःच्या जिद्दीवर आमच्यासाठी सामना जिंकले आहेत. सध्या तिला संघाकडून पाठिंब्याची गरज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
कौतुक तर होणारच! लहाण्या अपंग चाहत्याला आझमकडून भरभरुन प्रेम, दिला ‘असा’ प्रतिसाद
‘विराट’ मनाचा माणूस! कोरोनामुळे जिवलगांना गमावलेल्या कुटुंबाना करणार मदत, मिळवला नव्या संघाशी हात
‘अशी’ ३ कारणे ज्यामुळे पृथ्वी शॉला इंग्लंड दौऱ्यावर पाठवणे ठरेल अयोग्य