आयसीसी महिला विश्वचषक २०२२मध्ये ऑस्ट्रेलिया संघ शानदार कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (२२ मार्च) २१व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. हा ऑस्ट्रेलिया संघाचा महिला विश्वचषकातील सलग ६वा विजय होता. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने आधीच उपांत्य सामन्यातील आपले तिकीट पक्के केले आहे. कांगारू संघाने सर्वाधिक ६ वेळा वनडे विश्वचषकावरही आपले नाव कोरले आहे.
सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, दक्षिण आफ्रिका संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित ५० षटकात ५ विकेट्स गमावत २७१ धावा केल्या होत्या. मात्र, हे भलेमोठे आव्हानही ऑस्ट्रेलिया संघाने त्यांची कर्णधार मेग लॅनिंगच्या शतकाच्या जोरावर २८ चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले.
मेग लॅनिंगने (Meg Lanning) १३० चेंडू खेळत नाबाद १३५ धावा ठोकल्या. या धावा करताना तिने १ षटकार आणि १५ चौकारही ठोकले. ऑस्ट्रेलियाने या धावांचा पाठलाग करताना सलग १८वा वनडे सामना जिंकला. हा पुरुष आणि महिला क्रिकेटमधील नवीन विक्रम आहे. यापूर्वी भारतीय पुरुष संघाने २००५-०६मध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सलग १७ सामने जिंकले होते. इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या महिला संघांनी प्रत्येकी सलग १५वेळा सामना जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाने केलेला हा विक्रम हे दाखवून देतो की, त्यांचा संघ किती मजबूत आहे.
वनडेतील १५वे शतक, १०शतके आव्हानाचा पाठलाग करताना ठोकले
मेग लॅनिंगचे हे वनडेतील १५वे शतक आहे. विशेष म्हणजे, १० शतके तर तिने आव्हानाचा पाठलाग करतानाच ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष आणि महिला संघांचे विक्रम पाहिले, तर कोणताही खेळाडू आव्हानाचा पाठलाग करताना लॅनिंगपेक्षा जास्त शतक ठोकू शकला नाहीये. दिग्गज खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट आणि रिकी पाँटिंगने आव्हानाचा पाठलाग करताना वनडेत प्रत्येकी ८ शतक ठोकले आहेत. लॅनिंगने ९७ सामने खेळताना ५४च्या सरासरीने ४४२७ धावा केल्या आहेत. १५ शतकांव्यतिरिक्त तिने १९ अर्धशतकेही ठोकली आहेत. या धावा करताना तिचा स्ट्राईक रेट हा ९२ इतका होता.
वनडे विश्वचषकाबद्दल बोलायचं झालं, तर यात एकूण ८ संघ सामील झाले आहेत. प्रत्येक संघाला ७ सामने खेळायचे आहेत. टॉप-४मध्ये राहणारे संघच उपांत्य सामन्यात प्रवेश करतील. ऑस्ट्रेलिया संघाने १२ गुण मिळवले असून ते अव्वल स्थानी आहेत. दुसरीकडे भारत ६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशवरील विजयानंतर भारताची टॉप-३मध्ये उडी, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी अशी आहेत गणिते