न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पहिला संघ निश्चित झाला आहे. बुधवारी (३० मार्च) ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात महिला विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळला गेला, जो ऑस्ट्रेलियाने १५७ धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषाच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया महिला संघ ९ व्यांदा महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. तसेच त्यांनी आत्तापर्यंत ६ वेळा विश्वविजेतेपदही जिंकले आहे.
ऑस्ट्रेलियाने (Australia W Team) महिला विश्वचषक २०२२ (ICC Women’s World Cup 2022) मध्ये अतापर्यंत खेळलेल्या सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. संघाने लीग स्टेजमध्ये ७ आणि हा उपांत्य सामना असे एकूण ८ सामने खेळले आणि यामध्ये एकही पराभव पत्करला नाही.
पहिला उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना ५० ऐवजी ४५ षटकांचा केला गेला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ४५ षटकांमध्ये ३ विकेट्सच्या नुकसानावर ३०५ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने १०७ चेंडूत सर्वाधिक १२९ धावा केल्या. तसेच रेचेल हेंसनेही १०० चेंडूत ८५ धावा केल्या. या दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी २१६ धावांची भागीदारी झाली. शेवटच्या षटकांमध्ये बॅथ मूनीने ३१ चेंडूत ४३ धावा ठोकल्या आणि ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३०० पार घेऊन गेली.
वेस्ट इंडीजला विजयासाठी ४५ षटकांमध्ये ३०६ धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ ३७ षटकांमध्ये १४८ धावा करून सर्वबाद झाला. कर्णधार स्टेफनी टेलरने सर्वाधिक ४८ धावा केल्या. टेलव्यतिरिक्त कोणतीही खेळाडू खेळपट्टीवर अधिक काळ टिकू शकली नाही. वेस्ट इंडीजच्या ६ खेळाडू दोन आकडी धावसंख्याही गाठू शकल्या नाहीत.
वेस्ट इंडीजला पहिला झटका संघाची धावसंख्या १२ असताना मिळाला. रशादा विलियम्स शून्य धावांवर बाद झाली. त्यानंतर डिएंड्रा डॉटिनने ३५ चेंडूत ३४ धावा केल्या आणि ती तंबूत परतली. वेस्ट इंडीजला तिसरा झटका हॅली मॅथ्यूजच्या रूपात लागला. मॅथ्यूजने ३४ धावा करून ती जोनासेनची शिकार झाली. या तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर वेस्ट इंडीज संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही आणि नंतर संघाने १४८ धावांवर सर्व विकेट्स गमावल्या.
#TeamAustralia beat West Indies by 157 runs to secure their spot in the #CWC22 final. pic.twitter.com/cKdCNiebn8
— ICC (@ICC) March 30, 2022
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगचे कामगिरी पाहिली तर ती खूपच उत्कृष्ट आहेत. लॅनिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने ७४ एकदिवसीय सामने खेळले आणि त्यापैकी ६५ सामने संघाने जिंकले आहेत. ८ सामन्यांमध्ये संघाने पराभव पत्करला आहे आणि एक सामना अनिर्णीत राहिला आहे. महिला विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात होईल, जो गुरुवारी (३१ मार्च) खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022: केव्हा आणि कसा पाहाल बेंगलोर वि. कोलकाता सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धा ३ एप्रिल रोजी
लाराने २२ वर्षांपुर्वी चौथ्या डावात अशी काही फलंदाजी केली की सगळं जग लाराचा झालं फॅन