महिला विश्वचषकात (Womens World Cup 2022) भारतीय संघाला यजमान संघाविरुद्ध पराभवाचा (India beats by new zealand) सामना करावा लागला आहे. यानंतर मुख्य प्रशिक्षक रमेश पवार यांनी १२ मार्चला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी मार्गदर्शन केले आहे. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत २६१ धावा केल्या. लक्षाचा पाठलाग करताना भारताने सामना ६२ धावांनी गमावला. रमेश पवार यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत भारतीय खेळाडूंना जबाबदारीने खेळण्याचा सल्ला दिला आहे.
पवार म्हणाले की, “हा असा दिवस होता की, गोष्टी आपल्यासाठी अनुकूल नव्हत्या. पहिल्या २० षटकांत फलंदाजी पाहून मी हैराण झालो होतो. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मागील ६ सामन्यांचा विचार केला, तर आपण चांगल्या पद्धतीने खेळत होतो. संघाला स्पर्धेअगोदर सरावासाठी खूप वेळ मिळाला होता आणि आता प्रदर्शन करण्याची गरज आहे.”
रमेश पवार यांनी वरिष्ठ खेळाडूंना सांगितले की, “मिताली, स्म्रीती, झूलनसारख्या वरिष्ठ खेळाडूंना आता जास्तीत जास्त जबाबदारी घेत सामने जिंकावे लागणार आहेत. यामुळे युवा खेळाडूंवर दबाव पडणार नाही. मला वाटते की, हा विश्वचषकाचा दबाव आहे, परंतु मी कोणतेही कारण सांगू शकत नाही. आता ही कामगिरी करून दाखवण्याची वेळ आहे. आपण मागील ६ महिन्यांपासून सराव करत आहोत. आपण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला गेलो आणि न्यूझीलंडला लवकर पोहोचलो. आपल्याला सरावासाठी भरपूर वेळ मिळाला आणि आता योग्य प्रदर्शन करण्याची वेळ आहे.”
भारत आणि न्यूझीलंड संघांच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. भारतीय संघाने १६२ निर्धाव चेंडू खेळले आहेत. भारतीय संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण हेच ठरले आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, “ही महत्त्वाचे आहे की पहिल्या १० षटकात उत्साहाने फलंदाजी केली जावी. या विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नाही. आपण पहिल्या २० षटकातच मागे पडलो.”
या सामन्यात स्म्रीती मंधाना, मिताली राज, यास्तिका भाटिया आणि दीप्ती शर्मा यांच्यावर अधिक प्रयत्न न करण्याबाबात अनेकांनी टीका केली आहे. २६१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील हरमनप्रीत कौरशिवाय कोणीच खेळू शकले नाही. तिने ६२ चेंडूत ७१ धावा केल्या आहेत. भारतीय संघ २० षटकांत केवळ ५० धावा करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
“आता रोहितने ‘तो’ फटका खेळणे बंद करावे” भारतीय दिग्गजाचा हिटमॅनला सल्ला
बंगळुरू कसोटीपूर्वी श्रीलंकेला ‘डबल धक्का’, अर्धशतकवीर निसांकासह ‘हा’ खेळाडूही संघाबाहेर
पाकिस्तानात पोहोचला ‘सर जडेजा’! आफ्रिदीने भारतीय फिरकीपटूच्या गोलंदाजीची केली नक्कल, झाला ट्रोल






