मुंबई । गतवर्षी झालेल्या विश्वचषकातील सामन्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच वनडे सामन्यात एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. शुक्रवारपासून ( 11 सप्टेंबर) दोन्ही संघातील वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने इंग्लंड संघाविषयी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. फिंचच्या मते, विश्वविजेत्या इंग्लंड संघाला हरवणे कठीण आहे आणि त्यासाठी जगातील प्रत्येक संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
फिंच हा 2015 विश्वचषक जिंकणार्या ऑस्ट्रेलियन संघात होता पण त्या संघातील धुरंधर खेळाडू मायकेल क्लार्क, ब्रॅड हॅडिन आणि मिचेल जॉन्सन यांची कारकीर्द संपली. पण त्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये पहिले स्थान मिळवले. इंग्लंडलाही अव्वल स्थानी राहण्यासाठी अशाच प्रकारच्या अडचणी येत आहेत का असे विचारले असता फिंच म्हणाला, “इंग्लंड वनडे क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट संघ आहे. आम्हाला आणि जगातील प्रत्येक संघाला सतत त्यांना आव्हान द्यावे लागेल आणि सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.”
“तुम्ही इंग्लंडविरुद्ध आपले 90 टक्के देऊ शकत नाही. त्यांचा पराभव करण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के द्यावे लागेल आणि आम्ही या आव्हानासाठी तयार आहोत. इंग्लंडचा संघ वनडे क्रिकेटमध्ये ‘बेंचमार्क’ आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये ते दमदार आहेत. त्यांना अनुभव आहे आणि ते प्रत्येक क्षेत्रात मजबूत आहेत. त्यांनी चार वर्षे आक्रमक क्रिकेट खेळले, त्यामुळे ते विश्वचषक जिंकू शकले,” असेही फिंच याने सांगितले.






