मागील वर्षी 2022च्या अखेरीस भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि हातापायाला जबर दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अजूनही बरा झाला नाहीये. मात्र, चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, पंत वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत खेळणार आहे की नाही. अशात त्याच्या पुनरागमनाविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA)चे संचालक शाम शर्मा यांनी रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या दुखापतीविषयी अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, पंत बंगळुरू (Bangalore) येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA)मध्ये दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यावर लक्ष देत आहे. त्यांनी असेही सांगितले की, पंतचे विश्वचषकापूर्वी फिट होणे कठीण आहे. अशात असे म्हटले जात आहे की, पंत यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेचा भाग होऊ शकणार नाही.
बंगळुरूमध्ये पंतशी भेटल्यानंतर शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “रिषभ पंत चांगली प्रगती करत आहे. वनडे विश्वचषक संपल्यानंतर तो ठीक होऊ शकतो. तसेच, पूर्णपणे फिटही घोषित केल्यानंतरच एनसीएमधून बाहेर येईल.” खरं तर, 4 जानेवारी रोजी पंतची मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उजव्या गुडघ्याची सर्जरी झाली होती. तसेच, त्याला इतर दुखापतींसाठीही मुंबईला नेण्यात आले होते.
त्यांनी पुढे सांगितले की, “रिषभ पंत चांगल्याप्रकारे व्यायाम करत आहे. मी जवळपास अर्धा तास त्याच्याजवळ होतो. तो वेगाने बरा होत आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या व्यायाम करवून घेतले जात आहेत. त्याच्याकडून चालण्याचे, पायऱ्या चढण्याचे अनेक व्यायाम प्रकार करवून घेतले जात आहेत. तसेच, तो माती किंवा गवतावरही चालत आहे.”
कधी सुरू होणार विश्वचषक?
क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभमेळा म्हणजेच वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांचे आयोजन भारताच्या 10 वेगवेगळ्या शहरांतील स्टेडिअमवर केले जाईल. तसेच, भारतीय संघाचा विश्वचषकातील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे खेळला जाणार आहे. (world cup 2023 big update on cricketer rishabh pant health read here)
महत्वाच्या बातम्या-
ऐतिहासिक! बांगलादेशला चारीमुंड्या चीत करत वनडे मालिका अफगाणिस्तानच्या खिशात, आठ वर्षानंतर बांगलादेशवर नामुष्की
पहिल्यांदाच टीम इंडियात सामील झालेला शिलेदार चमकला! कर्णधाराला साथ देत चोपल्या ‘एवढ्या’ धावा