विश्वचषक 2023 स्पर्धेतील सलग चार सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी असणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध रविवारी (दि. 22 ऑक्टोबर) भारताचा सामना होणार आहे. हा सामना निसर्गाच्या सानिध्यातील धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या माजी खेळाडूने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल करावे लागू शकतात. त्याच्यानुसार, हार्दिक पंड्या याच्या दुखापतीमुळे संघात इतके जास्त बदल करावे लागतील.
खरं तर, भारताचा हुकमी एक्का हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला बांगलादेशविरुद्ध पहिलेच षटक टाकताना दुखापत झाली होती. यावेळी चौकार अडवण्याच्या प्रयत्नात त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झालेली. पंड्याला स्कॅननंतर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तो भारतीय संघासोबत धरमशाला येथे गेला नाहीये. तो आता थेट लखनऊमध्ये संघाशी जोडला जाईल. इथे संघाला इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे.
काय म्हणाला माजी भारतीय?
हार्दिक पंड्या बाहेर पडल्यानंतर आता भारतीय संघात बदल होणे निश्चित आहे. मात्र, हार्दिक हा अष्टपैलू होता, त्यामुळे त्याच्या जागी संघाला संतुलन राखण्यासाठी दोन खेळाडूंची निवड करावी लागेल. माजी भारतीय खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्या मते, पंड्यामुळे संघाला अनेक बदल करावे लागतील. त्याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना याविषयी विधान केलं.
तो म्हणाला, “मला वाटते की, हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव संघाचा भाग बनणार आहे आणि तो सहाव्या क्रमांकावर खेळेल. शार्दुल ठाकूर याच्या जागी मोहम्मद शमी येऊ शकतो. दुर्दैवाने एक खेळाडू बाहेर झाला, पण त्याच्या जागी कमीत कमी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करावे लागतील. यावरून पंड्याचे महत्त्व समजते.”
पंड्याचे विश्वचषकातील प्रदर्शन
विश्वचषकातील हार्दिक पंड्या याच्या प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर त्याने चमकदार कामगिरी केली आहे. गोलंदाजीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक विकेट, तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, त्याला एकदाच फलंदाजीची संधी मिळाली होती, ज्यात त्याने नाबाद 11 धावांची खेळी केली होती. अशात पंड्याच्या जागी कोणते दोन खेळाडू येतात, हे पाहावे लागेल. (world cup 2023 former cricketer reacts on indian team changes in absence of hardik pandya)
हेही वाचा-
आता माझी सटकली! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भडकला द्रविड; म्हणाला, ‘सिक्स-फोर पाहायचे असतील, तर…’
भारतीय संघात होणार मोठे बदल, खुद्द द्रविडने दिले संकेत; म्हणाला, ‘हार्दिकच्या दुखापतीने बिघडले…’