पुणे । भारत अ मुलांच्या संघाने महाराष्ट्र शासन, आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघ व भारतीय शालेय खेळ महासंघ, दिल्लीच्या वतीने आयोजित जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारत ब संघावर ४-१ने मात केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत अ संघाकडून दुहेरीत अक्षत सोनी-देवांश वर्मा जोडीने मिहीर-नमराज जोडीवर २१-१३, २१-१५ असा विजय मिळवला, तर प्रियांश चौधरी-यशराज पांडे जोडीने अभिमन्यू-अर्णव जोडीवर २१-०, २१-० अशी मात केली.
एकेरीत अक्षतने मिहीरवर १०-२१, २१-१५, २१-१५ असा विजय मिळवून भारत अ संघाला ३-० ने विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर देवांश वर्माने अर्णवचे आव्हान २१-२३, २१-१८, २१-१३ असे परतवून लावले.
अखेरच्या लढतीत भारत ब संघाच्या नमराजने यशराज पांडेवर २१-१२, १६-२१, २१-१० असा विजय मिळवला.
जॉर्जियाची भारत अ संघावर मात शालेय मुलींच्या गटात जॉर्जिया संघाने भारत अ संघावर ५-०ने मात केली. यात दुहेरीत निनो -लिली जोडीने कैफी गर्ग-प्रांजल पाठक जोडीवर २१-१३ २१-५ अशी, लिझी-केटी जोडीने इती पांडे-वंशिका के. जोडीवर २१-०, २१-० अशी मात केली.
एकेरीत लिलीने कैफीवर २१-५, २३-२१ असा, तर निनोने प्रांजलवर २१-१२, २१-५ असा विजय मिळवला. अखेरच्या लढतीत केटीने वंशिकाचे आव्हान २१-१९, २१-१४ असे २१ मिनिटांत परतवून लावले आणि जॉर्जियाला निर्भेळ यश मिळवून दिले.
सिलेक्टेडमध्ये भारत ब संघाचा विजय
सिलेक्टेड टीममध्ये मुलींच्या गटात भारत ब संघाने इंग्लंडचे आव्हान ४-१ ने परतवून लावले. यात इंग्लंडच्या लीह अलन-नताशा लाडो जोडीने व्ही. श्री कोकनट्टी -अनिशा वसे जोडीवर २३-२१, २१-१० अशी मात केली.
यानंतर तनिष्का देशपांडे-वर्षा वेंकटेश जोडीने मेगन थॉमस-अँजेलिना वाँग जोडीवर २१-३, २१-८ अशी मात करून भारताला बरोबरी साधून दिली. एकेरीत तनिष्काने अँजेलिनावर २१-४, २१-७ अशी सहज मात केली, तर अनिशाने नताशावर २१-१२, १८-२१, २१-१३ असा विजय मिळवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एकेरीतील अखेरच्या लढतीत वर्षाने लीहवर २१-९, २१-११ अशी मात केली.
निकाल -शालेय गट – मुली – बल्गेरिया – ५ वि. वि. भारत ब – ० (असाया-व्हेलेंटिन वि. वि. खुशी मैथली २१-७, २१-१६, व्हिक्टोरिया-मिहाएला वि. वि. रुची-श्रुती २१-५, २१-८, व्हॅलेंटिना-मैथली २१-५, २१-१०, मिहाएला वि. वि. खुशी २१-५, २१-५, व्हिक्टोरिया वि. वि. श्रुती २१-४, २१-५).