साधारण २ वर्षापूर्वी १ ऑगस्टपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेचा अंतिम सामना आता पुढील महिन्यात १८ ते २२ जून दरम्यान साऊथँम्पटन येथे होणार आहे. आता या अंतिम सामन्यासाठीचे काही नियम व अटी आयसीसीने जाहीर केले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड संघाने बलाढ्य संघांना मागे टाकत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे हे दोन संघ आता पहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी एकमेकांसमोर येतील. या सामन्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारत आणि न्यूझीलंड संघाची घोषणा झाली आहे. आता या सामन्यासाठीचे आयसीसीने जाहिर केलेले नियम काय आहेत, याकडे नजर टाकू.
१. चेंडू – भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणारा हा अंतिम सामना ग्रेड-१ ड्यूक क्रिकेट चेंडूने खेळला जाईल.
२. शॉर्ट रन – जेव्हा एखादा खेळाडू धाव घेताना बॅट क्रिजच्या आत टेकवत नाही तेव्हा ती धाव अपूर्ण मानली जाते, त्यालाच शॉर्ट रन असे म्हणतात. त्यामुळे जर अंतिम सामन्यात शॉर्ट रन झाली तर तिसरे पंच मैदानावरील पंचांच्या निर्णयानंतर स्वत: रिव्ह्यू घेऊ शकतात आणि त्यांचा निकाल पुढील चेंडू टाकण्यापूर्वी मैदानावरील पंचांना सांगितला जाईल.
३. प्लेअर्स रिव्ह्यू – जेव्हा खेळाडूंना मैदानावरील पंचांनी दिलेला निर्णय पटत नाही तेव्हा ते रिव्ह्यूची मागणी करत तिसऱ्या पंचांची मदत घेत असतात. या रिव्ह्यूबद्दल अंतिम सामन्यासाठी असा नियम करण्यात आला आहे की पायचीतच्या रिव्ह्यूसाठी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार किंवा बाद देण्यात आलेला फलंदाज रिव्ह्यू घेण्यापूर्वी मैदानावरील पंचांसह चेंडू खेळण्याचा खरंच प्रयत्न झाला होता का, याबाबतची पुष्टी करु शकतात.
४. डीआरएस रिव्ह्यू – नविन नियमानुसार पायचीतच्या रिव्ह्यूसाठी विकेट झोनची उंची वाढवून स्टंपच्या शिखरापर्यंत वाढवण्यात आली आहे. जेणेकरुन हे सुनिश्चित होईल की स्टंपच्या आसपासची उंची आणि रुंदी अंपायर्स कॉलसाठी सारखी असेल. म्हणजेच आता रिव्ह्यूमध्ये स्टंपच्या बेल्सपर्यंतची उंची मोजली जाईल, यापूर्वी बेल्सच्या खालच्या बाजूपर्यंतच उंची मोजली जायची.
५. राखीव दिवस आणि सामन्याचा निकाल – जर अंतिम सामना अनिर्णित ठरला किंवा बरोबरीत सुटला तर कसोटी चॅम्पियनशीपचे विजेतेपद विभागून दिले जाईल. तसेच २३ जून हा राखीव दिवस असेल, जेणे करुन कोणत्याही कारणाने सामन्याच्या नियोजित ५ दिवसांमध्ये कोणताही अडथळा आल्यास २३ जून रोजी सामना पूर्ण केला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात! केवळ १२ महिन्यात ‘या’ महिला खेळाडूने कमावलेत तब्बल ४०२ कोटी रुपये
‘मी खेळण्यास सज्ज होतो, परंतु व्यवस्थापनाला दुसरा खेळाडू माझ्यापेक्षा श्रेष्ठ वाटला’
पीएसएलच्या उर्वरित हंगामाचा मार्ग मोकळा, मुंबईहून चार्टर्ड विमान प्रवासाला युएई सरकारचा हिरवा कंदील