जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याचा फटका पाकिस्तान सुपर लीग २०२१ हंगामालाही बसला होता. या लीगमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने काही काळासाठी पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) हंगाम स्थगित करण्यात आला होता. परंतु जून महिन्यात संयुक्त अरब अमिरातीतील (युएई) अबू धाबीमध्ये पुन्हा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
तत्पुर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकातून येणाऱ्या चार्टर्ड विमानांना युएईत उतरवण्याची परवानगी न मिळाल्याने उर्वरित हंगामाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतु आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
युएई सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) मुंबई आणि जोहान्सबर्गहून अबु धाबीमध्ये चार्टर्ड विमान उतरवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पीएसएल २०२१ चा भाग असलेले भारत आणि दक्षिण आफ्रिकातील सदस्य, खेळाडू आणि इतर अधिकारी लवकरच या खाजगी विमानांनी अबु धाबीसाठी उड्डाण भरतील.
पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना म्हटले की, “अबु धाबी क्रिडा परिषदेने त्यांच्या संबंधित विभागांना मुंबई आणि जोहान्सबर्गमधून चार्टर्ड विमान आणण्याची अनुमती देण्यास सांगितले होते. आता त्यांनी यास परवानगी दिल्याने आमचा मार्ग रिकामा झाला आहे. याबरोबरच युएईच्या अधिकाऱ्यांनी पीएसएलचा भाग असलेल्या २५ भारतीय सदस्यांनाही भारतातून अबु धाबीची यात्रा करण्यासाठी व्हिसा दिला आहे.”
पीएसएल २०२१ मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ४ मार्च रोजी उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. या हंगामातील अजून २० सामने बाकी आहेत. पीएसएलच्या सर्व सहभागी फ्रँचायझी जवळपास २३३ खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांना आपापल्या चार्टर्ड विमानाद्वारे अबु धाबीला घेऊन येणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकाच्या प्रसारण टीमलाही व्हिसा मिळाल्याने तेही लवकरच अबु धाबीसाठी रवाना होतील. पीएसएलचा उर्वरित हंगाम ६ ते २० जून दरम्यान होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच ना! डेविड वॉर्नरची पत्नी ऑलिम्पिक दर्शकांना आपल्या वाणीतून करणार मंत्रमुग्ध
वयाच्या ४२व्या वर्षापर्यंत फिरकीपटू अश्विन क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणार!
कसोटी चॅम्पियनशीप फायनल अनिर्णीत किंवा ड्रॉ झाली तर कोण असणार विजेता? घ्या जाणून