सलग तिसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या भारतीय संघाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ दोन सामन्यांत पराभव पत्कारावा लागला. भारतीय संघ बंगळुरूमध्ये पहिला कसोटी सामना हरला होता. त्यानंतर पुण्यातही टीम इंडियाचा पराभव झाला. यामुळे आता भारतीय संघासाठी अंतिम फेरीचा मार्ग अवघड झाला आहे. टीम इंडियाला आता फायनलमध्ये स्थान मिळवायचं असेल, तर जबरदस्त खेळ दाखवावा लागेल.
जर आपण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेबद्दल बोललो, तर भारतीय संघ अजूनही अव्वल स्थानावर आहे. परंतु आता ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका सारखे संघ देखील फारसे मागे नाहीत. भारतीय संघ 62.82 टक्के गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचे 62.50 टक्के गुण आहेत. ते दुसऱ्या स्थानावर आहेत. त्याचप्रमाणे श्रीलंका तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे.
या लागोपाठच्या दोन पराभवांमुळे भारतीय संघाची पुढील वाटचाल आता कठीण झाली आहे. याचं कारण म्हणजे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर किमान चार सामने जिंकणे आवश्यक आहे. भारताला अजून एक सामना न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत खेळायचा आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ जिंकला, तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध किमान तीन सामने जिंकावे लागतील.
भारतीय संघासाठी साधं समीकरण असं आहे की, जर त्यांना जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर त्यांना पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा घरच्या मैदानावर पराभव करावा लागेल. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात किमान तीन सामने जिंकावे लागतील. तरच टीम इंडिया थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकेल. तसं न झाल्यास भारताला इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहता यावेळी ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणं खूप कठीण वाटतं.
हेही वाचा –
न्यूझीलंडनं अवघ्या 3 दिवसांत जिंकला सामना! भारताच्या दारुण पराभवामागचं कारण काय? जाणून घ्या
पुणे कसोटीत रोहित ब्रिगेडचा लाजिरवाणा पराभव, टीम इंडियानं घरच्या मैदानावर इतक्या दिवसांनी गमावली मालिका
“मी खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का?”, मनू भाकरची सोशल मीडियावर विचित्र पोस्ट