दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. डब्लूटीसी गुणतालिकेत आता टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर घसरली असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आली आहे. दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली. यासह ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या खूप जवळ आले आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गुणांची टक्केवारी सर्वाधिक 63.33 आहे. ऑस्ट्रेलियाचे 60.71 टक्के गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. भारताच्या गुणांची टक्केवारी 57.29 असून संघ तिसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत आता या तीन संघांमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी स्पर्धा आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हा विजय भारतासाठी मोठा धक्का मानला जातोय. आता भारतीय संघाची थेट लढत ऑस्ट्रेलियाशी आहे. टीम इंडियानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं, तरच त्यांच्याकडे अंतिम फेरीत जाण्याची आशा असेल. ॲडलेड कसोटीत भारताचा ज्या प्रकारे पराभव झाला, ते पाहता संघाला पुनरागमन करणं सोपं जाणार नाही.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला मायदेशात पाकिस्तानविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. आफ्रिकेनं या दोन कसोटींपैकी एक जरी कसोटी जिंकली, तर ते फायनलसाठी थेट पात्र ठरतील. मात्र या मालिकेत त्यांचा पराभव झाला, तरी ते स्पर्धेतून बाहेर होणार नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेच्या निकालावर इतर संघांचं भविष्य अवलंबून असेल. टीम इंडियाला जर पुढे जायचं असेल, तर त्यांना श्रीलंकेनं या मालिकेत किमान एक सामना अनिर्णित ठेवावा किंवा जिंकावा, अशी प्रार्थना करावी लागेल.
हेही वाचा –
डीएसपी मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? पदवी नसूनही नियुक्ती कशी झाली?
टीम इंडियासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
“तुम्ही आराम करु शकत नाही… “, लाजिरवाण्या पराभवानंतर सुनील गावस्करांनी टीम इंडियाला सुनावलं






