पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्यासाठी अजूनही 7 संघांमध्ये लढत सुरू आहे. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश शर्यतीतून बाहेर पडले असले तरी बाकीचे संघ अजूनही कोणत्या ना कोणत्या मार्गानं फायनलमध्ये पोहचू शकतात. एकवेळ भारताचा मार्ग सोपा वाटत होता, मात्र न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावरील 0-3 अशा पराभवामुळे भारतीय संघाची परिस्थिती बिकट झाली आहे. आता टीम इंडियाचा WTC फायनलमध्ये जाण्याचा मार्ग बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर अवलंबून असेल.
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे, मात्र भारताला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांकडून मोठा धोका आहे. याशिवाय श्रीलंकाही शर्यतीत कायम आहे. भारताविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंड मजबूत स्थितीत होता, पण ख्राईस्टचर्चमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडच्या पराभवामुळे डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलच्या टॉप 3 मध्ये कोणताही बदल झालेला नाही, पण आता अंतिम फेरी गाठण्याची लढाई रंजक बनली आहे.
पर्थमध्ये पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतानं पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावलं. टीम इंडियानं आतापर्यंत 15 सामने खेळले आहेत, ज्यात 9 विजय, 5 पराभव आणि 1 सामना अनिर्णित आहे. अशा प्रकारे भारताच्या खात्यात 110 गुण आहेत आणि संघाच्या गुणाची टक्केवारी 61.11 आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला बॉर्डर-गावस्कर मालिकेतील सर्व समीकरणं सांगणार आहोत, ज्यावर भारताचं अंतिम फेरीत पोहोचणं अवलंबून असेल.
भारतानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 5-0, 4-1, 4-0, 3-0 ने जिंकल्यावर – जर भारतानं सध्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला या फरकानं पराभूत केलं, तर संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळेल. नाहीतर भारताला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागेल.
भारतानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 3-1 ने जिंकल्यावर – जर भारतानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-1 अशा फरकानं पराभव केला, तर WTC फायनलमधील भारताचं स्थान निश्चित होईल. मात्र, यासाठी भारतीय संघाला मायदेशात खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका श्रीलंकेला पराभूत करू नये, अशी आशा बाळगावी लागेल.
भारतानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 3-2 ने जिंकल्यावर : जर भारतानं या स्कोअर लाइनसह ही मालिका जिंकली, तर ते थेट WTC अंतिम फेरीत स्थान मिळवू शकणार नाही. त्यासाठी भारतीय संघाला श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध किमान एक कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळेल, अशी आशा करावी लागेल.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-2 ने बरोबरीत राहिल्यास – या परिस्थितीत भारताला दुसऱ्या कसोटीतही दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेला पराभूत करण्याची आशा करावी लागेल. त्याचवेळी मायदेशात होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा किमान 1-0 अशा फरकानं पराभव व्हायला हवा.
हेही वाचा –
काय सांगता! 95 चेंडूत केवळ 5 धावा दिल्या, या गोलंदाजानं मोडला उमेश यादवचा मोठा रेकॉर्ड
दुसऱ्या कसोटीपूर्वी बुमराह-कोहली सराव सामना खेळले नाहीत, कारण जाणून घ्या
IND vs AUS; दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11, या खेळाडूंना मिळणार संधी