---Advertisement---

WPL 2026: दिल्ली कॅपिटल्सचा धमाका! सलग चौथ्यांदा गाठली फायनल; कुठे पाहता येणार लाईव्ह सामना?

On: बुधवार, फेब्रुवारी 4, 2026 8:12 PM
---Advertisement---

महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने स्पर्धेतील गुणतालिकेत अव्वल स्थानी राहून फायनलचं तिकीट मिळवलं. तर स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने दमदार कामगिरी करून गुजरातवर ७ गडी राखून एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्यांदा या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान फायनलचा सामना केव्हा, कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.

महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील फायनलचा सामना ५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना वडोदऱ्यातील बीसीए स्टेडियम कोटांबी येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक अर्ध्या तासाआधी म्हणजेच, ६:३० वाजता होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. यासह तुम्हाला जर हा सामना ऑनलाईन पाहायचा असेल किंवा सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहायचे असेल, तर तुम्ही जिओ हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

महिला प्रीमियर लीग स्पर्धेत या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दिल्ली कॅपिटल्स संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील ४ हंगामात दोन्ही संघ ९ वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ वेळा बाजी मारली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने केवळ ३ सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघ २ वेळा आमनेसामने आले होते. यापैकी एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ गडी राखून बाजी मारली. तर एका सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ७ गडी राखून विजयाची नोंद केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मानधनाकडे ऑरेंज कॅप पटकावण्याची संधी असणार आहे. स्मृतीने या हंगामात फलंदाजी करताना ८ सामन्यांमध्ये ४८.३३च्या सरासरीने २९० धावा केल्या आहेत. या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती तिसऱ्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर या यादीत अव्वल स्थानी आहे. हरमनप्रीत कौरने ३४२ धावा केल्या आहेत. तर स्मृती मानधनाला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी यायचं असेल, तर तिला आणखी ५३ धावा कराव्या लागणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---