महिला प्रीमियर लीग 2026 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सच्या 6 विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. या अटीतटीच्या सामन्यात खेर आरसीबीने शेवटच्या षटकात बाजी मारली. पहिल्या डावात खेळताना दिल्लीने 20 षटकांत 204 धावांचे ठेवले होते. ज्याचा पाठलाग करताना स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने 19.4 षटकात हा सामना जिंकला.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथा अंतिम सामना हरला आहे. त्यामुळे ट्रॉफीसाठी त्यांची प्रतीक्षा पुन्हा एकदा वाढली आहे. प्रथम फलंदाजी करताना, कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चार बाद 203 धावा केल्या. प्रत्युत्तरात, स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉल यांच्यातील महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वोच्च भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दोन चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. बंगळुरूने 19.4 षटकांत 4 बाद 204 धावा केल्या.
204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. ग्रेस हॅरिसने 7 चेंडूत फक्त 9 धावा केल्या. त्यानंतर स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 चेंडूत 165 धावांची विक्रमी भागीदारी केली, जी महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. वॉल 54 चेंडूत 79 धावांवर बाद झाली. रिचा घोष फक्त 6 धावा करू शकली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधना हिने 41 चेंडूत 87 धावांची दमदार खेळी केली. राधा यादवने 20व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचा निर्णय घेत, दिल्ली कॅपिटल्सच्या लिझेल ली आणि शफाली वर्मा या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 49 धावांची चांगली सुरुवात केली. सहाव्या षटकात अरुंधती रेड्डीने शेफाली वर्माला 13 चेंडूत 20 धावांवर बाद करून ही भागीदारी मोडली. त्यानंतर, आठव्या षटकात एन.डी. क्लार्कने लिझेल लीला बाद केले, जीने 30 चेंडूत 37 धावा केल्या, 16 व्या षटकात, सयाली सतघरेने जेमिमा रॉड्रिग्जला बाद करून आरसीबीला तिसरा विकेट मिळवून दिला. जेमिमा रॉड्रिग्जने 37 चेंडूत 57 धावा केल्या ज्यामध्ये तिने आठ चौकार मारले.
दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 बाद 203 धावांचा मोठा आकडा गाठला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर वुल्फार्ट धावबाद झाली. तिने 25 चेंडूत 44 धावा केल्या, शिवाय शेनेल हेन्री 15 चेंडूत 35 धावांवर नाबाद राहिली, आरसीबीकडून अरुंधती रेड्डी, एनडी क्लार्क आणि सयाली सतघरेने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
बातमी अपडेट होत आहे…






