भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला ऑलिम्पिक चाचण्यांपूर्वी मोठा झटका बसला आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं (NADA) बजरंगला तात्पुरतं निलंबित केलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या बजरंगनं मार्चमध्ये सोनिपत येथे झालेल्या राष्ट्रीय चाचण्यांमध्ये डोपचा नमुना दिला नव्हता, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्रानं सांगितलं की, बजरंगनं सोनीपत येथे झालेल्या चाचण्यांदरम्यान लघवीचा नमुना देण्यास नकार दिला होता. जोपर्यंत बजरंगचं निलंबन मागे घेतलं जात नाही तोपर्यंत तो कोणत्याही स्पर्धेत किंवा चाचण्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही.
10 मार्च रोजी NADA ने बजरंग पुनियाला त्याचा नमुना देण्यास सांगितलं होतं. परंतु या स्टार रेसलरनं तसं केलं नाही. यानंतर WADA ने NADA ला बजरंगला नोटीस बजावून चाचणीला नकार का दिला याचं उत्तर देण्यास सुचवलं. ‘नाडा’नं बजरंग पुनिया याला २३ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती आणि ७ मेपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे. बजरंग जेव्हा ‘नाडा’ला उत्तर देईल तेव्हाच सुनावणीची तारीख ठरवली जाईल.
पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आयोजित राष्ट्रीय निवड चाचणीत बजरंग पुनियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. टोकियो ऑलिम्पिक (2020) कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाला 65 किलो फ्रीस्टाइल वजन गटाच्या उपांत्य फेरीत कुस्तीपटू रोहित कुमारनं पराभूत केलं होतं. अशा परिस्थितीत 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या त्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना बजरंग पुनिया म्हणाला, ‘नाडा अधिकाऱ्यांना नमुने देण्यास मी कधीही नकार दिला नाही. मी त्यांना विनंती केली की, त्यांनी काय पावले उचलली किंवा त्यांनी माझा नमुना गोळा करण्यासाठी आधी आणलेल्या कालबाह्य झालेल्या किटवर काय कारवाई केली, याचं उत्तर द्यावं. त्याचं उत्तर द्या आणि मग माझी डोप चाचणी घ्या. माझे वकील विदुश सिंघानिया योग्य वेळेत या पत्राला उत्तर देतील.”
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात संपावर बसलेल्या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया याचा समावेश होता. बजरंग पुनियानं नुकतेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ला पत्र लिहून WFI विरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. तथापि, काही दिवसांनंतर, UWW ने WFI वरील बंदी उठवली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन मैदानावर कधी परतणार? या हंगामात पुन्हा खेळणार की नाही?
बर्फाळ दऱ्यांमध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाला ऋतुराज गायकवाड, पाहा चेन्नईच्या कर्णधाराचं हे वेगळं रुप