भारतीय केंद्र सरकारने संसदेत पास केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देशभर आंदोलन सुरु आहे. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात हजारोच्या संख्येने शेतकरी एकत्र आले आहेत. या आंदोलनाला बॉलीवूडमधील काही कलाकार, खेळाडू आणि इतर समाजसेवी संस्थांनी पाठिंबा दिला आहे. खेलरत्न पुरस्कार विजेती कुस्तीपटूनेही ट्विटरच्या माध्यमातून पाठिंबा जाहिर केला आहे.
विनेश फोगटने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केले ट्विट
नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या निषेधाबद्दल आपले मत व्यक्त करताना खेलरत्न पुरस्कार विजेती कुस्तीपटू विनेश फोगट ट्विटरवर म्हणाली की, “बोलून थकलो आहे. आता मला समाधान हवे आहे. मला दुसऱ्या कुणाच्याही हक्काचा नको, मला माझ्या मेहनतीबद्दल आदर हवा आहे.”
थक गया हूँ बोलते- बोलते, अब बस समाधान चाहता हूँ।
मैं किसी और के हक़ का नहीं बस अपनी मेहनत का सम्मान चाहता हूँ..।। #किसान_आंदोलन 🙏🙏
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) December 6, 2020
पुरस्कार परत करतायत खेळाडू
पंजाब आणि हरियाणाचे काही खेळाडू शेतकर्यांशी ऐक्य दर्शविण्यासाठी पुरस्कार (पद्म, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कार) परत करत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कुस्तीपटू करतार सिंग म्हणाला की, “शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आम्ही पुरस्कार परत करू.”
…तर राजीव गांधी पुरस्कार परत करेन- विजेंदर सिंग
राजीव गांधी पुरस्कार खेळाच्या क्षेत्रात मिळालेला सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग याने रविवारी (6 डिसेंबर) आंदोलनात उपस्थिती दर्शवली आणि म्हणाला, “सरकारने कृषी कायदा मागे घेतला नाही, तर मी मला मिळालेला राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार परत करेल.”
योगराज सिंग यांनी आंदोलनाला दर्शवला पाठिंबा
माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “पुरस्कार परत करणारे खेळाडू पुरस्काराचा सन्मान करत नाही, असा त्याचा अर्थ नाही. निषेध करणार्या शेतकर्यांशी एकता दाखवण्याचा त्यांचा हा मार्ग आहे. बऱ्याच वर्षांच्या मेहनतीने पुरस्कार मिळवले जातात, ते मिळवणे सोपे नसते. जर ते परत करत असतील, तर माझा त्यांना पाठिंबा आहे. मी शेतकऱ्यांसोबत आहे, ते योग्य गोष्टीची मागणी करत आहेत.”