कानपूर। गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला कसोटी सामना खेळला गेला. ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताने दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित करत पहिल्या डावातील ४९ धावांच्या आघाडीसह २८४ धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून दुसऱ्या डावात श्रेयस अय्यर आणि वृद्धिमान साहा यांनी अर्धशतके केली. यासह वृद्धिमान साहाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.
भारताने दुसरा डाव घोषित केला, तेव्हा वृद्धिमान साहा १२६ चेंडूत ६१ धावांवर नाबाद खेळत होता. त्यामुळे तो कसोटीत अर्धशतक करणारा सर्वात वयस्कर यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. साहाने हे अर्धशतक केले, तेव्हा त्याचे वय ३७ वर्षे ३५ दिवस इतके होते. त्याने हा विक्रम करताना फारुख इंजिनियर यांचा विक्रम मोडला आहे.
इंजिनियर यांनी १९७४ साली वय ३६ वर्षे ३०७ दिवस असताना कसोटीत अर्धशतक झळकावले होते. या यादीत साहा आणि इंजिनियर यांच्या पोठापोठ सय्यद किरमाणी, नाना जोशी आणि एमएस धोनी आहे.
कसोटीत अर्धशतक करणारे सर्वात वयस्कर भारतीय यष्टीरक्षक
३७ वर्षे आणि ३५ दिवस – वृद्धिमान साहा, २०२१
३६ वर्षे आणि ३०७ दिवस – फारुख इंजिनियर, १९७४
३५ वर्षे आणि २० दिवस – सय्यद किरमाणी, १९८५
३४ वर्षे आणि ४१ दिवस – नाना जोशी, १९६०
३३ वर्षे आणि ३९ दिवस – एमएस धोनी, २०१४
मानेच्या दुखापतीमुळे केले नाही यष्टीरक्षण
साहाने या सामन्यातील तिसऱ्या दिवशी मानेच्या दुखापतीमुळे यष्टीरक्षण केले नाही. त्याच्याऐवजी श्रीकर भरत राखीव यष्टीरक्षक म्हणून उतरला होता. पण, असे असले तरी चौथ्या दिवशी साहाने फलंदाजीला येत महत्त्वपूर्ण ६१ धावांची खेळी केली. त्याने यावेळी श्रेयस अय्यरसह ७ व्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली, तर अक्षर पटेलसह नाबाद ६७ धावांची भागीदारी केली. अय्यरने ६५ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने २३४ धावांवर डाव घोषित केला.
तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३४५ धावा केल्या होत्या. तसेच न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या. त्यामुळे भारताला ४९ धावांची आघाडी मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोनाचा क्रिकेटला पुन्हा खो! आयसीसीने रद्द केली ‘ही’ प्रमुख स्पर्धा
श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीतच रचला मोठा इतिहास, ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय
हार्दिकने घेतलाय धक्कादायक निर्णय! भविष्याबाबत निवडकर्त्यांना सांगितले…