fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

वृद्धिमान सहाचा धमाका; २० चेंडूंतच ठोकले शतक

आयपीएलच्या ११व्या मोसमाला काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आज भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहाने एक धमाकेदार खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सहाने आज मुखर्जी ट्रॉफी या स्पर्धेत खेळताना चक्क २० चेंडूंतच शतक पूर्ण केले. सहाने मोहन बागान क्लबकडून खेळताना बीएनआर रीक्रिएशन क्लब विरुद्ध ५१० च्या स्ट्राईक रेटने १४ षटकार आणि ४ चौकारांच्या साहाय्याने २० चेंडूत नाबाद १०२ धावा केल्या.

त्याच्या या शतकामुळे मोहन बागान संघाने १० विकेट्सने विजय मिळवला. तत्पूर्वी बीएनआर रीक्रिएशन संघाने २० षटकात ७ बाद १५१ धावा केल्या होत्या आणि मोहन बागान संघाला १५२ धावांचे आव्हान दिले होते.

हे आव्हान पार करताना सहाच्या तुफानी खेळाला कर्णधार शुभमय दासने उत्तम साथ दिली. त्याने २२ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यामुळे सहा आणि दास या दोंघांनी मिळून ७ षटकातच मोहन बागान क्लबला विजय मिळवून दिला.

सहाकडे नेहमीच कसोटी खेळाडू म्हणून बघितले जाते. पण आजच्या त्याच्या खेळीने मात्र सर्वांना चकित केले आहे. त्याची आयपीएलचीही आजपर्यंतची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यांने १०४ आयपीएल सामन्यात २५.५२ च्या सरासरीने १५५७ धावा केल्या आहेत.

तसेच तो आयपीएलच्या अंतिम सामन्यात शतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला होता. त्याने २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना अंतिम सामन्यात शतक केले होते. पण तरीही त्याच्या संघाला कोलकाताकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

सहा यावर्षी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून खेळताना दिसणार आहे. याआधी त्याने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

You might also like