नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा (Indian Test Squad Against Sri Lanka) केली आहे. ४ मार्च ते १६ मार्च दरम्यान मोहाली आणि बंगळुरू येथे २ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी शनिवारी (१९ फेब्रुवारी) संघ जाहीर झाला आहे. या संघात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराबरोबर अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) यालाही वगळले गेले आहे. यानंतर या ३७ वर्षीय क्रिकेटपटूने प्रतिक्रिया देताना बरेच खुलासे केले आहेत.
रहाणे, पुजाराबरोबर वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि साहा यांना श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेले नाही. रहाणे आणि पुजाराला न निवडण्यामागचे कारण सांगताना निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी त्यांच्या खराब फॉर्मचा हवाला दिला आहे. तसेच इशांतलाही त्याची मागील काही महिन्यांमधील निराशाजनक कामगिरी पाहता संधी दिली गेली नसल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा- INDvsSL: भविष्यासाठी ऍक्शन सुरू; पूर्वसूचना देत रहाणे, पुजारासह ४ सीनियर्सची कसोटी संघातून सुट्टी
परंतु साहाला संघातून वगळण्यामागचे कोणतेही कारण त्यांनी सांगितलेले नाही. भारताच्या मागील दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर साहाला त्याच्या संघातील स्थानाबद्दल योग्य ती माहिती दिली असल्याचे चेतन शर्मा म्हणाले आहेत.
याबद्दल टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना साहा (Wriddhiman Saha On Rahul Dravid) म्हणाला की, हो. मला सांगण्यात आले होते की, मी भविष्यातील सामन्यांमध्ये भारताच्या कसोटी संघाचा भाग नसेल. अगदी भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मला निवृत्तीचा विचार करण्याचा सल्लाही (Dravid Suggested Saha To Retire) दिला होता.
पण या सर्व गोष्टींपेक्षा साहाला सौरव गांगुलीच्या बोलण्याच्या जास्त वाईट वाटले असल्याचे त्याने सांगितले आहे. बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने त्याचा विश्वास तोडला असल्याचे साहाने (Wriddhiman Saha On Sourav Ganguly) म्हटले आहे.
जेव्हा मी न्यूझीलंडविरुद्ध कानपूर येथे पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद ६१ धावांची खेळी केली होती. तेव्हा दादाने वॉट्स अपवर माझे अभिनंदन केले होते. त्यांनी मला असे सुद्धा म्हटले होते की, ते जोपर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत, तोपर्यंत मला जास्त काळजी करण्याची गरज नाहीये. त्यांच्या अशा बोलण्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. पण लगेचच गोष्टी इतक्या कशा बदलल्या, मला कळाले नाही, असे साहाने शेवटी सांगितले.