भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज शुक्रवार (1 नोव्हेंबरपासून) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने भारताचा ताण वाढवला आहे. दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांग्लादेशचा 2-0 असा पराभव करून डब्ल्यूटीसी गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे. या विजयानंतर त्यांच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या शक्यता मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर 0-2 ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियासाठी डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. जर भारताने न्यूझीलंडविरुद्धची तिसरी आणि शेवटची कसोटी गमावली, तर केवळ नंबर-1चा मुकुटच गमावणार नाही, तर संघ डब्ल्यूटीसीच्या फायनलच्या शर्यतीतूनही बाहेर पडू शकतो.
डब्ल्यूटीसी 2023-25 सायकलमध्ये टीम इंडियाचे 6 सामने बाकी आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाला कोणत्याही किंमतीत चार विजय आवश्यक आहेत. जर टीम इंडियाने यापेक्षा कमी सामने जिंकले तर त्यांची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता इतर संघांच्या निकालावर अवलंबून असेल. या 6 पैकी भारताला न्यूझीलंडविरुद्ध एक कसोटी खेळायची आहे. उर्वरित 5 सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायचे आहेत.
डब्ल्यूटीसी फायनलचे समीकरण….
बांग्लादेशवर 2-0 असा शानदार विजय नोंदवल्यानंतर दक्षिण आफ्रिका 54.17 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्यांच्या पुढे भारत (62.82), ऑस्ट्रेलिया (62.50) आणि श्रीलंका (55.56) आहेत. दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीतील मार्ग आता सुकर झाला आहे. कारण त्यांच्या उर्वरित दोन मालिका पाकिस्तान (2) आणि श्रीलंकेविरुद्ध (2) मायदेशात आहेत.
जर दक्षिण आफ्रिकेने उर्वरित चार कसोटी सामने जिंकले तर त्यांच्या खात्यात 69.44 टक्के गुण होतील आणि ते सहज अंतिम फेरीत पोहोचू शकतील. तर केवळ तीनच विजय मिळाल्यास काय होईल? अशावेळी ते केवळ 61.11 टक्के गुण मिळवू शकतील. इतके गुण मिळवूनही ते अंतिम फेरीत पोहोचू शकतील.
मुंबई कसोटीत भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर 2-0 ने हरवले तेव्हा दक्षिण आफ्रिकेसाठी समस्या उद्भवू शकतात. या स्थितीत भारताचे गुण 65.48 आणि ऑस्ट्रेलियाचे गुण 67.86 टक्के असतील. मात्र, या दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे गुणही महत्त्वाचे ठरतील.
बीजीटी इंडिया 3-2 जिंकल्यास, त्यांच्या खात्यात 64.04 टक्के गुण असतील, या स्थितीत ऑस्ट्रेलियाकडे फक्त 60.53 टक्के गुण शिल्लक राहतील. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने 3-2 असा विजय मिळवला तर त्यांना 65.79 टक्के गुण मिळतील आणि भारताची गाडी केवळ 58.77 टक्के गुणांवरच अडकेल.
मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाचे 62.28 टक्के आणि भारताचे 60.53 टक्के गुण होतील. या सर्व परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे.
हेही वाचा-
विराटला मागे टाकत, हा फलंदाज आयपीएलमधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू
रोहित की हार्दिक, आयपीएल 2025 मध्ये मुंबईचा कर्णधार कोण असेल? फ्रँचायझीचा मोठा खुलासा
ट्रॉफी जिंकूनही श्रेयस अय्यरला नाही मिळाला भाव, आयपीएल संघांनी ‘या’ 5 कर्णधारांना केले रिलीज