जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असणार आहेत. अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची ही भारताची सलग दुसरी वेळ आहे. अशात लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारत विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. याव्यतिरिक्त भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराटकडे या सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. तो वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज सर विवियन रिचर्ड्स आणि वीरेंद्र सेहवाग यांना एका विक्रमात मागे टाकू शकतो.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात विराट रचणार इतिहास?
इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier League 2023) स्पर्धेपासून विराट कोहली (Virat Kohli) हा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो हंगामात सर्वाधिक धावा (639) करणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातही विराट मोठा कारनामा करू शकतो. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विवियन रिचर्ड्स आणि वीरेंद्र सेहवाग (Sir Vivian Richards And Virender Sehwag) यांना मागे टाकू शकतो. सेहवागला मागे टाकताच तो, भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज बनेल.
रिचर्ड्स-सेहवागही पडतील मागे!
विराट कोहली याने आतापर्यंत 108 कसोटी सामने खेळताना 8416 धावांचा पाऊस पाडला आहे. जर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 125 धावा केल्या, तर तो सर विवियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) यांच्या 8540 धावांचा विक्रम मोडू शकतो. एवढंच नाही, तर त्याच्याकडे वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याच्या कसोटी धावांचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. सेहवागने कसोटीत 8586 धावा केल्या आहेत. विराटला या धावांचा टप्पा पार करण्यासाठी 171 धावांची गरज आहे. मात्र, इतक्या धावा करणे त्याच्यासाठी सोपे नाहीये, पण विराट ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो या दोन्ही दिग्गजांचा विक्रम मोडू शकतो.
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज
भारतासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. 15921 धावांसह तो जगातील कसोटीत सर्वाधिक धावा करणारा अव्वल फलंदाजही आहे. या यादीत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज राहुल द्रविड आहे. त्याने 13288 धावा केल्या आहेत. त्यानंतर 10122 धावांसह सुनील गावसकर तिसऱ्या स्थानी आहेत. तसेच, चौथ्या स्थानी 8781 धावांसह व्हीव्हीएस लक्ष्मण चौथ्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवाग 8586 धावांसह पाचव्या स्थानी आहे. यानंतर सहाव्या स्थानी विराट कोहली असून त्याच्या नावावर 8416 धावा आहेत. (wtc final 2023 virat kohli can break vivian richards and sehwag most test runs record against aus)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
इंग्लंडमध्ये ‘या’ भेदक गोलंदाजापुढे गिल करणार संघर्ष, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे WTC फायनलपूर्वी मोठे विधान