तब्बल दोन वर्षांपासून, ज्या गोष्टीची सगळे क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते त्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरुवात खऱ्या अर्थाने शनिवारी (१९ जून) रोजी झाली. भारतीय संघाचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपल्यानंतर, न्यूझीलंड संघाची सध्या फलंदाजी सुरु आहे. दरम्यान अंतिम सामन्याचा क्रिकेटप्रेमींना पुरेसा आनंद घेता आला नाही. इंग्लंडमध्ये चालू असलेल्या या अंतिम सामन्यात कधी पावसाने त्रास दिला तर, कधी कमी प्रकाशामुळे खेळ थांबण्यात आला.
या ऐतिहासिक सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (२१ जून) रोजी दिवसभर पावसाने फलंदाजी केली. त्यामुळे, हा दिवस पूर्णपणे वाया गेला आणि म्हणूनच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या वाट्याला निराशा आली. आता प्रश्न असा आहे की, पाचव्या दिवसाचा (२२ जून) खेळ होणार की नाही?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. पंचानी जवळ जवळ साडे चार तास वाट पाहून चौथ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याची घोषणा केली. याबद्दल माहिती देताना आयसीसीने सांगितले की, ‘कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.’ सतत पडत असलेल्या पावसामध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. याबाबत ट्वीट करून आयसीसीने सांगितले की, ‘आम्ही आमच्या प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो की, त्यांनी सामन्याचा उत्साह अजून बनवून ठेवला आहे. आपण उद्या भेटू.’
आता हवामान खात्याचा माहितीनुसार साउथम्पटनमध्ये मंगळवारी सुद्धा पावसाची चिन्हे दिसत आहेत. साउथम्पटनमध्ये सकाळी पाऊस असण्याची शक्यता आहे आणि तसेच हे ढगाळ वातावरण दुपारपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस जरी नाही पडला तरीही, कमी प्रकाशामुळे सुद्धा खेळ थांबवला जाऊ शकतो. कारण साउथम्पटनमध्ये ९४% काळे ढग असण्याचा अंदाज आहे.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आतापर्यंतच्या चार दिवसांत ३६० षटकांचा खेळ झाला पाहिजे होता. परंतु, केवळ १४१.४ इतकेच षटक झाले आहेत. आता उरलेल्या सामन्यात जास्तीत जास्त १९६ षटक टाकले जाऊ शकतात. अशात सामना रद्द किंवा अनिर्णीत झाल्यास दोन्ही संघाना विजयी घोषित करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC फायनल: पावसामुळे २ दिवस वाया गेल्यानंतर आयसीसीकडून दर्शकांना ‘मोठा दिलासा’
पावसामुळे कसोटी चॅम्पियनशीप फायनल ड्रॉ झाली तर कोण असेल विजेता? घ्या जाणून