विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत असून अनेक क्रिकेट विश्लेषक तसेच माजी खेळाडू या कसोटीबद्दल आपली मते मांडत आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने देखील शुक्रवारी न्युझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या विश्व कसोटीच्या अंतिम सामन्याचे महत्व अधोरेखित केले आहे. त्याने सांगितले की, हा अंतिम सामना एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्या एवढाच महत्वाचा आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इंग्लंडमध्ये 18 तारखेपासून हा अंतिम सामना खेळायचा आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय)च्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केलेल्या व्हिडिओत इशांतने सांगितले की, “कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामान्यापर्यंतचा प्रवास खेळाडूंकरिता भावनाप्रधान राहिला आहे. मागच्या दोन कसोटी मालिका विजयामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.”
त्या व्हिडिओत पुढे इशांतने सांगितले की, “विराट कोहलीने आम्हाला सांगितले आहे की, हे (कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास) काही आपण मागील एक महिना कष्ट आणि घाम गाळून केलेले यश नाही. तर मागच्या दोन वर्षांच्या काळातील मेहनत आहे. आम्हाला कोरोना काळात जास्त मेहनत घ्यावी लागली. नियमांमध्ये झालेले बदल आणि आम्ही यामुळे दबावात होतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध कठीण मालिका जिंकून आम्ही इंग्लडविरुद्ध खेळायला परत आलो. कारण आम्हाला 3-1 ने जिंकायचे होते.”
इशांतचा सहकारी गोलंदाज मोहम्मद शमीने देखील इशांतच्या व्यक्तव्यावर सहमती दर्शवली. त्याने सांगितले की, “ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयामुळे आमच्यात हा विश्वास आला की आम्ही न्युझीलंडला देखील हरवू शकतो.”
शमीने सांगितले की, “आपण कुठल्याही परिस्थितीतून पुनरागमन करू शकतो. हा विश्वास आपल्याजवळ असणे हे सर्वात महत्वाचे आहे. या विश्वासामुळेच भारतीय संघाने 36 धावांच्या मानहानीकारक पराभवाच्या राखेतून मालिका विजयाचा मेरू पर्वत गिळला. मी जरी त्या मालिकेचा भाग नसलो तरी त्या मालिकेने आम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वास दिला.”
भारत या सामन्यात कशा प्रकारच्या गोलंदाजी संयोजनात उतरेल ही पाहण्यासारखी गोष्ट ठरेल. कारण बऱ्याच अवधींनंतर इशांत, शमी आणि बुमराह एकाच वेळी निवडीसाठी उपलब्ध आहेत आणि मोहम्मद सिराज सारखा खेळाडू देखील आहे. भारताला इशांत आणि सिराजपैकी एकाची निवड करणे नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे. मात्र अनुभवामुळे इशांतला संधी दिली गेली तर आश्चर्य वाटणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
वय विसरा! जेव्हा धोनीने दिली होती १२ वर्षे लहान असलेल्या हार्दिकला धावण्याच्या शर्यतीत मात
अनुष्काच्या कॉफीवरुन टीका, पण ऑस्ट्रेलियामध्ये जिंकल्यावर कौतुक नाही- माजी निवडकर्ता
आयपीएलचा नादच खुळा! खेळाडू तर खेळाडू, प्रशिक्षकसुद्धा करोडपती; पाहा त्यांचा पगार