भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज डब्ल्यूव्ही रमण यांच्यावर भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रमण यांनी हे पद मिळवताना 2011 चे विश्वचषक विजेते प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना मागे टाकले आहे.
भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करताना बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘एडी-एचओसी समीतीॆने गॅरी कर्स्टन, डब्ल्यूव्ही रमण आणि व्यकटेश प्रसाद यांची प्रधान्यक्रमाने नावे निश्चित केली होती.’
‘पण कर्स्टन हे आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रशिक्षक असल्याने भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जाबाबदारी घेऊ शकत नाही. कारण येथे बीसीसीआयच्या संविधानानुसार ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस्ट’ (परस्पर हितसंबंध)चा मुद्दा येतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेत बीसीसीने रमण यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.’
प्रशिक्षकपदाची निवड करणाऱ्या एडी-एचओसी समीतीमध्ये कपील देव, अंशुमन गायकवाड आणि शांथा रंगस्वामी यांचा समावेश होता.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेली समीती(सीओए)मधील मतभेदानंतरही ही निवड करण्यात आली आहे. सीओएच्या सदस्या डायना एडुलजी यांनी सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांना ही प्रशिक्षक निवड प्रक्रिया स्थगित करण्यासाठी सुचवले होते. तसेच बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनीही एडुलजी यांच्या मंजूरीशिवाय ही प्रक्रिया पूर्ण कशी झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे.
रमण यांनी भारताकडून 11 कसोटी सामने 27 वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये तमिळनाडू, बंगाल अशा मोठ्या संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे. त्याचबरोबर 19 वर्षांखालील भारतीय संघाचेही प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
53 वर्षीय रमण हे सध्या बंगळूरुमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी मार्गदर्शक आहेत.
भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी 28 अर्जदारांमधून कर्स्टन, रमण आणि प्रसाद यांच्या व्यतिरिक्त मनोज प्रभाकर, ट्रेंट जॉनस्टोन, दिमित्री मास्करेनहास, ब्रॅड हॉज आणि कल्पना वेंकटचार यांचीही अंतिम उमेदवारांमध्ये निवड करण्यात आली होती.
कर्स्टन हे या पदासाठी पहिली पसंती होते. त्यांनी भारतीय पुरुष संघाचे 2008 ते 2011 दरम्यान प्रशिक्षकपद सांभाळले होते. तसेच त्यानंतर तो 2011 ते 2013 दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक होते. सध्या ते आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रशिक्षक आहेत.
भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी मागील महिन्यात संपुष्टात आला आहे. त्यामुळे बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते. त्यामुळे पोवार यांनीही भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज दाखल केला होता.
तसेच मागील महिन्यात मिताली राज आणि रमेश पोवार हा वाद चर्चेत होता. विंडिजमध्ये पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघातून मितालीला वगळण्यात आले होते. त्यानंतर तिने पोवार यांच्यावर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला आहे.
पण टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्म्रीती मानधनाने पोवार यांना पाठींबा देताना त्यांची पुन्हा प्रशिक्षकपदावर नियुक्ती करावी अशी मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–मी आयपीएलमध्ये एवढाही काही वाईट खेळलो नाही- जयदेव उनाडकट
–७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं
–माझं काय चुकलं सांगा, आयपीएलमध्ये स्थान न मिळालेल्या खेळाडूचा त्रागा