भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडियानं जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या डावात भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली होती. तर दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी धमाल उडवून टाकली.
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत एक मोठा विक्रम रचला आहे. यशस्वीनं कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम केला. त्यानं या बाबतीत न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमला मागे टाकलं.
कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम करण्यासाठी यशस्वी जयस्वालला फक्त दोन षटकारांची आवश्यकता होती. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात तो चुकला, मात्र त्यानं दुसऱ्या डावात हे यश मिळवलं. मॅक्युलमनं 2014 मध्ये कसोटीत 33 षटकार मारले होते. आता जयस्वालनं 34 षटकारांसह त्याला मागे टाकलं आहे.
यशस्वीनं भारताच्या दुसऱ्या डावाच्या 52व्या षटकात नॅथन लायनला 100 मीटर दूर षटकार ठोकला. हा त्याचा या वर्षातील 34वा षटकार होता. जयस्वालला यावर्षी आणखी काही कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे तो 50 षटकारांचा आकडा देखील गाठू शकतो. यशस्वी जयस्वाल यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
यशस्वी पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात आपलं खातंही उघडू शकला नव्हता. त्यामुळे काही चाहत्यांनी त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र या फलंदाजानं दुसऱ्या डावात या सर्वांची बोलती बंद केली. जयस्वाल अत्यंत संयमी फलंदाजी करत 193 चेंडूत 90 धावा करून नाबाद परतला. त्याच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. आता तिसऱ्या दिवशी तो ऑस्ट्रेलियातील आपलं पहिलं शतक साजरं करेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.
हेही वाचा –
पर्थ कसोटीत टीम इंडियाचा दबदबा, यशस्वी-राहुलच्या जोरावर भारताकडे 200 पेक्षा जास्त धावांची आघाडी
IND vs AUS: पर्थमध्ये टीम इंडियाने 1948 नंतर पहिल्यांदाच केला असा पराक्रम
“तू मुलगी का झालास?”, चाहत्याच्या प्रश्नाला आर्यन बांगरचं थेट उत्तर; म्हणाला…