युवा फलंदाज यशस्वी जयस्वालनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून कधीही मागे वळून पाहिलेलं नाही. त्यानं सातत्यानं चांगली कामगिरी करून कसोटी आणि टी20 संघात आपली जागा पक्की केली आहे. आता तो लवकरच भारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण करू शकतो. अनेक अहवालांनुसार, कदाचित यशस्वीला आगामी इंग्लंड मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते. भारतीय संघ 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत यशस्वी जयस्वाल सलामीवीर म्हणून खेळताना दिसेल. या मालिकेत त्याच्याकडे एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान यशस्वीला सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज बनण्याची संधी आहे. या डावखुऱ्या फलंदाजानं 23 सामन्यांमध्ये 723 धावा केल्या आहेत. यशस्वी 1000 टी20 धावा पूर्ण करण्यापासून फक्त 277 धावा दूर आहे. जर तो पुढील चार डावांमध्ये ही कामगिरी करू शकला, तर तो विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो आणि ही कामगिरी करणारा सर्वात जलद भारतीय बनू शकतो. जर त्यानं पाच डाव खेळले तर तो विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करेल.
विराट कोहलीनं भारतासाठी 27 डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. कोहलीनं 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी20 पदार्पण केलं होतं. या यादीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 29 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. इंग्लंडच्या डेव्हिड मलाननं सर्वात जलद 24 डावांमध्ये ही कामगिरी केली.
यशस्वी जयस्वालनं ऑगस्ट 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 पदार्पण केलं. यानंतर तो 2024 टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये यशस्वीची सरासरी 36.15 आणि स्ट्राईक रेट 164.32 आहे. 100 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
हेही वाचा –
“हा खेळाडू सचिन तेंडुलकरपेक्षाही चांगला”, ग्रेग चॅपेल यांनी केली धक्कादायक तुलना
विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाजाचा धुमाकूळ! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळेल का?
विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये शतक, ऑस्ट्रेलियात एकाच सामन्यात मिळाली होती संधी