भारतीय क्रिकेटमध्ये सध्या युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचे नाव अत्यंत चर्चेत आहे. मागील वर्षी देशांतर्गत हंगाम तसेच यावर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 171 धावांची लाजवाब खेळी करत सर्वांचे मन जिंकले. यशस्वी मोठ्या कष्टाने इथपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. मात्र, आता त्याला क्रिकेटचे धडे देणाऱ्या प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याच्या याच संघर्षाच्या कहाणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यशस्वी हा उत्तर प्रदेशाच्या बधोई येथून अगदी कमी वयात क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईत आला होता. त्यानंतर मुंबई येथे राहण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागलेला, असे त्याने एका मुलाखतीत सांगितलेले. आपण एका डेअरीत तसेच, वीज नसलेल्या तंबूत राहिल्याचे त्याने सांगितले होते. यासोबतच पाणीपुरी विकल्याचे देखील तो सांगतो. पाणीपुरी विकतानाचे त्याचे काही फोटो देखील उपलब्ध आहेत. मात्र, ज्वाला सिंग यांनी त्याचीही कहाणी खरी नसल्याचे म्हटले. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,
“यशस्वीची जी कहाणी सांगितली जाते ती केवळ पाच टक्के खरी आहे. तो काही दिवसच फक्त त्या तंबूत राहिला होता. तसेच, काही वेळ तो फेरीवाल्यांकडे काम करत. त्याचा त्याला मोबदला दिला जाई. मागील नऊ वर्षांपासून मी त्याच्यासोबत असून, ज्यावेळी तो माझ्याकडे आला त्यानंतर त्याचा संघर्ष संपला. इतक्या हालाखीच्या परिस्थितीत कोणीही क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊ शकत नाही अथवा तशी शारीरिक क्षमता ही निर्माण होत नाही. तो मागील चार वर्षांपासून आयपीएल खेळतोय. तसेच त्याआधी देखील सोळा वर्षांचा असतानाच त्याची भारताच्या अंडर नाईन्टीन संघात निवड झाली होती.”
यशस्वी सध्या 23 वर्षांचा असून, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुढील सितारा म्हटले जाते. त्यामुळे ज्वाला सिंग यांच्या वक्तव्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
(Yashasvi Jaiswal Childhood Coach Jwala Singh Said His Panipuri Story Is False)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान वनडे संघाला मोठी विश्रांती, 2023 विश्वचषकानंतर खेळाडू एक वर्षांच्या सुट्टीवर
वेस्ट इंडीजसाठी युवा स्पिनर करणार कसोटी पदार्पण! दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा