रविवारी बांगलादेशमध्ये 19 वर्षांखालील एशिया कपचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात 19 वर्षांखालील भारतीय संघाने 19 वर्षांखालील श्रीलंका संघाचा 144 धावांनी पराभव करत सहाव्यांदा एशिया कपवर नाव कोरले.
या सामन्यात भारताकडून सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 85 धावा केल्या होत्या. त्याने अनुज रावत बरोबर पहिल्या विकेटसाठी 121 धावांची शतकी भागीदारीही रचली.
यशस्वी या स्पर्धेत 4 सामन्यात खेळला असून या चारही सामन्यात त्याची कामगिरी चांगली झाली आहे. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचाही विक्रम केला आहे. यशस्वीने या चार सामन्यात 1 शतक आणि 2 अर्धशतके केली आहेत.
त्याने अनुक्रमे 104, 92, 37 आणि 85 अशा धावा करताना एकूण 318 धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे.
तसेच त्याने सातत्याने 19 वर्षांखालील संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. त्याने जुलैमध्ये श्रीलंका विरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेतही चांगली कामगिरी करताना एक शतकासह 130 धावा केल्या होत्या.
यशस्वी हा श्रीलंका दौऱ्यासाठी 19 भारतीय संघाची निवड झाल्यानंतर प्रकाश झोतात आला होता. ही निवड होण्याआधी पाणीपुरीचा गाडा चालवणाऱ्या यशस्वीचा कठिण परिस्थितून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंतच प्रवास हा खडतर होता. पण त्यानेही त्याची 19 वर्षांखालील झालेली निवड योग्य असल्याचे गेल्या दोन महिन्यात सिद्ध केले आहे.
त्याच्या या कामगिरीनंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
कोण आहे यशस्वी जयस्वाल-
जून महिन्यात श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाल्याने प्रकाशझोतात आलेल्या यशस्वी जयस्वालने क्रिकेट खेळण्यासाठी पाणीपुरीची गाडीही चालवली आहे.
यशस्वी वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न घेऊन एकटा उत्तर प्रदेशमधील भदोहीहून मुंबईत आला. त्याने मुंबईमध्ये आझाद मैदानावरील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये कित्येक दिवस उपाशी पोटी काढले मात्र त्याने आपली जिद्द सोडली नाही.
त्याच्या घरची परिस्थिती हालाकीची असूनही वडील त्याला पैसे पाठवायचे मात्र तेवढे पैसे त्याला पुरत नव्हते. त्यासाठी त्याला पाणीपुरीचा गाडाही चालवावा लागला.
यशस्वी जयस्वालच्या खेळावर 19 वर्षाखालील मुंबई संघाचे प्रशिक्षक सतिश सामंत खूप प्रभावित झाले. त्यांनी यशस्वी पुढे जाऊन मुंबई क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावणार असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच सतिश सामंत यांनी यशस्वी जयस्वालच्या यशाचे श्रेय त्याच्या मुस्लिम युनायटेड क्लबचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांना दिले आहे. यशस्वीही त्याच्या यशाचे श्रेय ज्वाला सिंग यांनांच देतो.
यशस्वी श्रीलंका विरुद्धच्या मालिकेआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही भेटला आहे.
सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि वासिम जाफर हे यशस्वीचे आदर्श आहेत. तसेच त्याने इंडियन आॅइलसाठी जाफरबरोबरही क्रिकेटही खेळले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–…तरच भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत वन-डेत येणार अव्वल स्थानी
–PBL 2018: प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये भारतीय खेळाडू मालामाल
–आसीसीच्या त्या नियमाने कर्णधार विराट कोहली वैतागला