भारताचा युवा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. त्याने 9 कसोटी सामने खेळून एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक होतेय. यादरम्यान त्याने भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या विषयी महत्त्वाचे वक्तव्य केले.
श्रीलंका दौऱ्यात यशस्वी जयस्वालला प्रथमच टीम इंडियाचे नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली. नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “गौतम सर सर्व खेळाडूंना खूप सपोर्ट करतात. त्यामुळेच खेळाडू निर्भयपणे खेळू शकतात. श्रीलंका मालिकेदरम्यान मी त्यांच्याशी बोललो होतो. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि म्हणाले फक्त जा, मुक्तपणे खेळा आणि खेळाचा आनंद घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत. यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला आणि आम्हाला निर्भयपणे खेळण्यास मदत झाली.”
यशस्वी याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत दीडशतक झळकावलेले. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 712 धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्येही त्याने आतापर्यंत 23 सामन्यात 164.32 च्या स्ट्राइक रेटने 723 धावा केल्या आहेत. त्याने अद्याप वनडे पदार्पण केले नाही.
यशस्वी जयस्वाल दुलिप ट्रॉफीमध्ये भारत ब संघाचा भाग आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी म्हणून दुलिप ट्रॉफीकडे पाहिले जात आहे. या तयारीविषयी बोलताना तो म्हणाला, “मी आधी दुलिप ट्रॉफी आणि नंतर बांगलादेश मालिकेसाठी नेटमध्ये मेहनत घेत आहे. वैयक्तिक विक्रमांनी मला फरक पडत नाहीत. सातत्यपूर्ण कामगिरी करणे आणि आपल्या कौशल्यांवर काम करत राहणे ही क्रिकेटमधील मुख्य गोष्ट आहे. दुलिप ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी यांसारख्या देशांतर्गत स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत.” बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी भारतीय संघासाठी सलामी देताना दिसेल.
हेही वाचा –
इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्यावर टांगती तलवार, दुसऱ्या देशात खेळली जाऊ शकते मालिका; काय आहे कारण?
भारतीय वंशाच्या स्टार क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये लढतोय आयुष्याची लढाई
असं करणं अशक्यच! शुभमन गिलनं मागे धावत जाऊन घेतला अविश्वसनीय झेल, VIDEO एकदा पाहाच