भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. तिसरा कसोटी सामना आता लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाईल. तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने त्यांच्या प्लेइंग 11 संघाची घोषणा केली आहे. एजबॅस्टन येथे पराभूत झालेल्या संघात एक बदल करण्यात आला आहे. जोश टोंगला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करून संघ व्यवस्थापनाने जोफ्रा आर्चरवर जुगार खेळला आहे. पण लॉर्ड्स कसोटीसाठी अकरा खेळाडूंची निवड करताना इंग्लिश निवडकर्त्यांनी मोठी चूक केली. हा चुकीचा निर्णय घेऊन ब्रिटीशांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे.
एजबॅस्टन कसोटी पराभवानंतर इंग्लंडने त्यांच्या सध्याच्या संघात तात्काळ बदल केले. गस अॅटकिन्सनला संघात समाविष्ट करण्यात आले. अॅटकिन्सन संघात आल्यानंतर तो लॉर्ड्सवर खेळेल हे जवळजवळ निश्चित होते. तरीदेखील, अॅटकिन्सनला अंतिम अकरा जणांमध्ये स्थान देण्यात आले नाही. अॅटकिन्सनचा लॉर्ड्सवरचा विक्रम कमाल राहिला आहे. त्याने आतापर्यंत या मैदानावर खेळलेल्या 2 सामन्यात एकूण 19 बळी घेतले आहेत. अॅटकिन्सनने लॉर्ड्सवर एका डावात तीन वेळा 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने बॅटने शतकही झळकावले आहे. अॅटकिन्सनचा विक्रम माहित असूनही इंग्लंडने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केलेले नाही. तिसऱ्या कसोटीत संघ व्यवस्थापनाचा हा चुकीचा निर्णय खूप जड ठरू शकतो.
इंग्लंडने जोफ्रा आर्चरला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यासाठी जोश टोंगला बेंच करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज टोंग आहे. टोंगने 2 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. असे असूनही त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एजबॅस्टन येथे इंग्लंडला भारताकडून 336 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने दिलेल्या 608 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 276 धावांनी पराभूत झाला.





