शुक्रवारी (23 जून) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वनडे संघांची घोषणा केली गेली. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्याकडे जबाबदारी कायम ठेवली असून, पुनरागमन केलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त दोन्ही संघात अनेक युवा खेळाडूंना देखील संधी मिळालीये. कसोटी संघात मुंबईचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याची निवड झाली. त्यानंतर त्याने प्रतिक्रिया देताना भारताच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंचे आभार मानले.
देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलमध्ये धावांचा अक्षरशः रतीब घातल्यानंतर यशस्वी जयस्वाल याला भारतीय संघात संधी मिळाली आहे. मागील वर्षी देशांतर्गत हंगामात त्याने सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. तसेच आयपीएलमध्ये तो उदयोन्मुख क्रिकेटपटू ठरलेला. हा सर्व विचार करत त्याला आता कसोटी संघात संधी मिळाली आहे. चेतेश्वर पुजाराच्या जागी तो तिसऱ्या स्थानी आपला हक्क सांगू शकतो.
या निवडीनंतर बोलताना तो म्हणाला,
“भारतीय संघात निवड होणे हे माझे स्वप्न होते. ही बातमी ऐकून माझे वडील अत्यंत भावनिक झाले. या प्रवासात आतापर्यंत अनेकांनी साथ दिली आहे. भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू असलेले रोहित शर्मा, विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांचा माईंड सेट अत्यंत सकारात्मक असतो. ज्या-ज्या वेळी मी त्यांच्याशी बोललो आहे मला याची प्रचिती आली. आपला खेळ आणखी एक काय पाऊल पुढे कसा नेता येईल? याबाबत त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या.”
यशस्वी नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडू ठरला होता. त्याआधी मुंबईसाठी तसेच पश्चिम विभागासाठी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केलेली.
(Yashasvi Jaiswal Speaks After His Team India Selection)
महत्वाच्या बातम्या-
जशी कमाई, तसा खर्च! विराटच्या नवीन घड्याळाची किंमत ऑडी कारच्या किंमतीपेक्षा जास्त, आकडा तर वाचाच
‘आता रणजी खेळणं बंद कर…’, विंडीज दौऱ्यासाठी निवडकर्त्यांकडून सरफराजकडे दुर्लक्ष, संतापले गावसकर